Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर हजारो अफगाण नागरिक देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी करत आहेत. तालिबानी दहशतीचा सामना करत अनेक अडचणींवर मात करत अफगाणी नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी जीवाचा आकांत करत आहेत. अशातच एक भावूक घटना समोर आली आहे. तुर्कस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमेत एका गर्भवती अफगाणी महिलेची विमानातच प्रसूती करण्यात आली. २६ वर्षीय अफगाणी महिला सोमन नूरी हिनं ३० हजार फूट उंचीवर तुर्की एअरलाइन्सच्या विमानात चिमुकलीला जन्म दिला. विमानात यावेळी कोणताही डॉक्टर नव्हता. अशा कठीण प्रसंगी विमानातील कर्मचाऱ्यांनीच तिची मदत केली. आई आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याचं सांगितलं गेलं आहे. (Afghanistan Crisis Afghan woman gives birth to baby girl in Turkish Airlines at an altitude of 30 000 feet)
सोमन आणि त्यांचे पती या दोघांना काबुलहून दुबईला नेण्यात आलं. त्यानंतर ते दोघंही बर्मिंघमसाठी तुर्की एअरलाइन्सच्या विमानातून निघाले. उड्डाणाच्या काही वेळानं सोमन नूरी यांना प्रसुती कळा सुरू झाल्या आणि विमानातील क्रू सोमन यांच्यासाठी धावून आला. विमानातील महिला कर्मचारी आणि एअरहॉस्टेस त्यांच्यासाठी देवदूत ठरल्या. सोमन नूरी यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यानंतर विमान कुवेत येथे उतरविण्यात आलं. आई आणि बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलं. दोघंही सुखरूप आणि सदृढ असल्याचं डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झालं. सोमन नूरी यांनी मुलीचं नाव हव्वा असं ठेवलं आहे.