काबुल - तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने आता देशात नवे सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी तालिबानच्या तावडीत सापडण्याऐवजी देशातून पळ काढणे योग्य समजून पलायन केले आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित करत तालिबानविरोधात लढाई सुरू केली आहे. काबुल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार सालेह यांच्या सैन्याने तालिबानच्या ताब्यातून काबुलच्या उत्तरेस असलेल्या परवन प्रांतामधील चरिकर भाग हिसकावून घेतला आहे. तर पंजशीरमध्ये तालिबान आणि सालेह यांच्या सैन्यामध्ये घनघोर लढाई सुरू आहे. (Afghanistan Vice President Saleh Army snatches Charikar from Taliban, heavy fighting in Panjshir)
काबुल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सध्या पंजशीर कंठच्या बाहेरील भागात तालिबानसोबत लढाई सुरू आहे. अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती असलेल्या अमरुल्ला सालेह यांच्या सैन्याने परवान प्रांतातील चरिकर भागात नियंत्रण मिळवले आहे. आता पंजशीरमध्ये लढाई सुरू आहे, असे काबुल न्यूजच्या सूत्रांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता संपूर्ण देशात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नॉर्दन अलायन्सचे माजी कमांडर अहमद शाह मसूद यांचा गड असलेले पंजशीर खोरे काबुलच्या जवळ आहे. या भागावर १९८० पासून २०२१ पर्यंत तालिबानचे कधीही वर्चस्व प्रस्थापित झालेले नाही. सोव्हिएट युनियन आणि अमेरिकेनेही या भागात केवळ हवाई हल्ले केले होते. मात्र येथील भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात कधीही लष्करी कारवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे याच भागाच आहेत. मी तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर कधीही झुकणार नाही. तसेच आपले नेते अहमद शाह मसूद, कमांडर आणि गाईडचे आत्मे आणि वारशाशी कधीही विश्वासघात करणार नाही, असे ट्विट सालेह यांनी केले आहे.
अफगाणिस्तानमधील दुर्गम अशा पंजशीर खोऱ्यावर १९७०च्या दशकात सोव्हिएट युनियन आणि १९९० च्या दशकात तालिबानलाही कब्जा करता आला नव्हता. शेर ए पंजशीर म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद हे या भागाचे सर्वात मोठे कमांडर होते. या भागाची भौगोलिक रचना अशी आहे की कुठलेही सैन्य या भागात पोहोचण्याची हिंमत करू शकत नाही.