Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:52 PM2021-08-18T15:52:52+5:302021-08-18T15:53:56+5:30
Afghanistan Crisis: तालिबानने महिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
काबुल - अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबानने आपले कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसताना दिसत आहे. (Afghanistan Crisis) तालिबाननेमहिलांसाठी १० नियम लागू केले आहेत. शरियानुसार बनवलेल्या या नियमांचे पालन करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. तसे न केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. (ban on wearing tight clothes & Sandals, 10 rules made by Taliban for women, punishment for non-compliance)
तालिबानने महिलांसाठी बनवलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत.
-जवळचा नातेवाईक सोबत असल्याशिवाय महिलांना घराबाहेर पडता येणार नाही
-घराबाहेर पडताना महिलांनी बुरखा परिधान करणे अनिवार्य आहे
- महिलांच्या येण्याची चाहूल पुरुषांना लागू नये यासाठी महिलांनी हाय हिल्स वापरू नयेत
- सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये
- ग्राऊंड फ्लोअरवर असणाऱ्या घरांच्या खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असल्या पाहिजेत. जेणेकरून घरात राहणाऱ्या महिला दिसरणार नाहीत.
- महिलांना फोटो काढण्यास बंदी असेल. तसेच त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रे, पुस्तके आणि घरांमध्ये लावता कामा नयेत
- महिला शब्द सुद्धा कुठल्याही जागेच्या नावावरून हटवण्यात यावा
- घराच्या बाल्कनीमध्ये तसेच खिडकीमध्ये महिला दिसता कामा नयेत.
- महिलांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता कामा नयेत
- महिलांनी नेल पेंट लावता कामा नये. तसेच त्यांनी कुटुंबीयांच्या मर्जीशिवाय विवाह करू नये
नियम न मानल्यास मिळणार अशी शिक्षा
तालिबान नियम न पाळल्यास कठोर शिक्षा देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. महिलांसाठी बनवलेले नियम कायदे जर कुणी मोडले तर त्यांना क्रूर शिक्षा मिळू शकते. तालिबानच्या काळात महिलांना सार्वजनिकरीत्या अपमानित करणे तसेच बेदम मारहाण करून त्यांना मृत्यूदंड देणे ह्या शिक्षा सामान्य होत्या. अवैध संबंध असल्यास अशा महिलेला सार्वजनिकरीत्या मृत्यूदंड दिला जातो. टाईट कपडे वापरल्यासही अशीच शिक्षा दिली जाते. तसेच एखादी मुलगी लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे नाक आणि कान कापून तिला मरण्यासाठी सोडले जाते. तसेच महिलांनी नेल पेंट लावल्यास त्यांची बोटे कापण्याची शिक्षा दिली जाते.