Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता तालिबानी नियम लादण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. अफगाणिस्तानातील सरकारी वृत्त वाहिन्यांवरील महिला वृत्त निवेदकांना बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर अफगाणिस्तानातील सरकारी वृत्त वाहिन्यांवर आता तालिबानीच बातम्या सांगणार आहेत. तालिबान्यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन महिलांना इस्लामच्या अखत्यारित राहून त्यांचे सर्व अधिकार त्यांना दिले जातील असं म्हटलं होतं. त्याच आधारावर महिलांनाही काम करण्याची मुभा असेल असा दावा केला होता. दुसरीकडे तालिबान्यांनी सरकारी वृत्त वाहिन्यांमधील महिला निवेदकांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. (Afghanistan Crisis Taliban bans women news anchors in government channels now Taliban anchors will read news)
अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या एका सरकारी वृत्त वाहिनीतील सर्व महिला निवेदकांना तालिबान्यांनी बदलून टाकलं आहे. त्यांच्याऐवजी आता तालिबानी निवेदक बातम्या देणार आहेत. "मी आता काय करू? आता माझ्या हातात काहीच काम राहिलेलं नाही. गेल्या २० वर्षांत मी जे काही कमावलं ते सारं पाण्यात गेलं. तालिबानी हे तालिबानी आहेत ते कधीच बदलणार नाहीत", असं नोकरीवरून काढून टाकण्यात आलेली वृत्त निवेदिका खदीजा अमीना म्हणाली.
तालिबाननं पत्रकार परिषदेत काय सांगितलं?तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुहाहिद यानं काल पत्रकार परिषद घेऊन तालिबानची भूमिका जगासमोर मांडली होती. "२० वर्षांपासूनच्या लढाईनंतर आम्ही परदेशी सैन्याला येथून पळवून लावलं आहे. आता आम्ही सर्व जुन्या गोष्टी विसरलो आहोत. आमच्याविरोधात झालेल्या सर्व गोष्टींबाबत आम्ही माफी दिली आहे. अफगाणिस्तानातील सर्व दूतावासांना तालिबानकडून सुरक्षा दिली जाईल याची शाश्वती आम्ही जगाला देऊ इच्छितो. आमचं कोणत्याही देशासोबत शत्रुत्व नाही आणि आमच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही सर्वांना माफ केलं आहे", असं जबीहुल्ला मुजाहिद म्हणाला.
तालिबानच्या नियमांबाबत चिंता करण्याचं कोणतंच कारण नाही. आम्ही महिलांसोबत भेदभाव करणार नाही. आमच्या भगिनी मुस्लिम आहेत आणि त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. देशाच्या फायद्यासाठी ज्या काही गोष्टी योग्य असतील त्या केल्या जातील, असंही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.