आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:43 PM2024-05-13T16:43:00+5:302024-05-13T16:46:07+5:30
Afghanistan flood: शुक्रवारपासून देशात आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
Afghanistan flood: युद्धातून बाहेर पडल्यानंतर आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला आणखी एका समस्येचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारपासून देशात आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. पुराच्या पाण्याने एवढी नासधूस केली आहे की, खेड्यापाड्यातील शेती, रस्ते, घरे वाहून गेली आहेत आणि पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील बदख्शान, घोर, बागलान आणि हेरात या प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, पुरामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अनेक बाधित भागात औषधे, अन्न, सुरक्षा आणि आपत्कालीन किट इत्यादी मदत सामग्री आंतरराष्ट्रीय मदत एजन्सीकडून पुरवण्यात येत आहेत.
वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, 'सेव्ह द चिल्ड्रन' या संघटनेने लहान मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मोबाइल आरोग्य आणि बाल संरक्षण पथकांसह 'क्लिनिक ऑन व्हील'ची सुविधा पुरवली आहे. बाघलान विभागातील पाच जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. सेव्ह द चिल्ड्रेनचे कंट्री डायरेक्टर अर्शद मलिक यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, “जीव आणि मालमत्ता दोन्हीचे बरेच नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे गावे, घरे वाहून गेली आहेत. जनावरे मरण पावली आहेत. परिसरातील कुटुंबे अजूनही दुष्काळाच्या आर्थिक परिणामांशी झुंजत आहेत आणि त्यांना त्वरित मदतीची गरज आहे.
एका वृत्तानुसार, पुरात एक हजाराहून अधिक घरे, जनावरे आणि हजारो हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे. अनेक पूरग्रस्त भागात मदतीसाठी ट्रक पोहोचणे कठीण झाले आहे. शनिवारी, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने सदस्य देश आणि जगभरातील इतर देशांना अफगाणिस्तान मधील पूरग्रस्तांना त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनीही अचानक आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी मदतीची मागणी केली आहे.