तालिबान शासित अफगाणिस्तान अलीकडे अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी तालिबाननेअफगाणिस्तानात महिलांच्या विद्यापीठ स्तरावरील शिक्षणावर बंदी घातली होती. मात्र यावेळी तालिबान आपल्या सुपरकारमुळे चर्चेचा विषय बनला आहे. काही तालिबान इंजिनिअर्सनी एक विशेष कार तयार केली आहे, ज्याला Mada 9 (सुपर कार Mada 9) असे नाव देण्यात आले आहे. कार तयार करण्यासाठी त्यांना जवळपास 5 वर्षांचा कालावधी लागला. ही सुपरकार तालिबानचे उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी सादर केली होती आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ही कार ENTOP नावाच्या कंपनीने बनवली आहे.
सध्या हे एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे. एन्टॉप आणि काबुलच्या अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्युटच्या 30 इंजिनिअर्सने मिळून तयार केली आहे. फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर यात टोयोटा कोरोलासारखे इंजिन देण्यात आलेय. सुपरकारसाठी इंजिनमध्ये थोडा बदल करण्यात आलाय. रिपोर्टनुसार कारमध्ये इंटिरिअरचे काम अद्याप शिल्लक आहे. आतापर्यंत या कारसाठी 40 ते 50 हजार डॉलर्सचा खर्च आला आहे.
इंजिनिअर्सने कारची कथितरित्या टेस्टिंगही केली आहे. ही कार कुठे चालवण्यात आली याचा व्हिडीओ मात्र उपलब्ध नाही. सर्वच व्हिडीओमध्ये ही कार एका ठिकाणी उभी असल्याची दिसत आहे. बाहेरुन ही कार अतिशय स्पोर्टी दिसून येते. या कारचा व्हिडीओ आल्यानंतर नेटकऱ्यांनी तालिबानची फिरकी घेतली.
नेटकऱ्यांनी घेतली फिरकी अफगाणिस्तानच्या पुनर्निर्मितीसाठी आणि विकासासाठी आपली भूमिका बजावण्यासाठी सर्वच अफगाण तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे या व्हिडीओसोबत म्हटले आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनीही यानंतर फिरकी घेतली. एका युझरनं विचारलं की रॉकेट लाँचर कुठे लावणार. तर अन्य एका युझरनं यावर बंदूक कुठे लावणार असा प्रश्न विचारला आहे.