पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) अबुधाबी येथे पहिल्या हिंदूमंदिराचे उद्घाटन केले. यानंतर, कुराणचा उल्लेख करत, मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ''मंदिराच्या भिंतींवर हिंदू धर्मासोबतच इजिप्शियन चित्रलिपी आणि कुराणातील कथाही कोरण्यात आल्या आहेत. हे मंदिर सांप्रदायिक सद्भावाचे आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल. अबुधाबीतील हे विशाल मंदिर केवळ प्रार्थनास्थळच नाही, तर मानवतेच्या समान वारशाचे प्रतीक आहे.
140 कोटी लोक माझे आराध्य -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपली संस्कृती आणि आस्था आपल्याला जगाच्या कल्याणासाठी संकल्पबद्ध होण्याची प्रेरणा देते. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्रावर भारत काम करत आहे. मला विश्वास आहे की, अबू धाबीतील मंदिराची मानवतावादी प्रेरणा आपल्या संकल्पांना ऊर्जा देईल आणि तो संकल्प प्रत्यक्षात आणेल. मोदी पुढे म्हणाले, इश्वराने माला जेवढा वेळ दिला आहे, त्याचा प्रत्येक क्षण आणि जे शरीर दिले आहे, त्याचा कण-कण केवळ आणि केवळ भारत मातेसाठी आहे. 140 कोटी लोक माझे आराध्य देव आहेत.
राम मंदिराचा उल्लेख -अबुधाबीमध्ये बांधलेले हे मंदिर तसे महत्त्वाचे आहे. या मंदिराने आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या संबंधांमध्ये नवी सांस्कृतिक ऊर्जा भरली आहे. हे केवळ प्रार्थनास्थळ नाही तर मानवतेचा समान वारसा आहे. भारतात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रामलला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय अजूनही त्याच आनंदोत्सवात आहे. माझे मित्र म्हणत होते, मोदीजी हे सर्वांत मोठे पुजारी आहेत. मंदिराचा पुजारी होण्याची माझी पात्रता आहे की नाही, हे मला माहिती नाही, पण मी भारतमातेचा पुजारी आहे, याचा मला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.