अमेरिकेनंतर या देशानेही दिली WHO सोबतचे संबंध तोडण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:16 AM2020-06-10T03:16:24+5:302020-06-10T03:16:35+5:30
जागतिक आरोग्य संघटनेसमोरील अडचणी आणखी वाढल्या
जीनिव्हा : कोरोना संसर्गानंतर जगभरातील देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेबाबत रोष वाढताना दिसत आहे. अमेरिकेनंतर आता ब्राझिलनेही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ब्राझिलने संघटनेवर पक्षपात आणि राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेने पैसे देणे थांबवताच संघटनेने दिलेली सर्व आश्वासने फिरवल्याचा आरोप ब्राझिलने केला आहे. कोरोनाप्रकरणी संघटनेने चीनवर अधिक विश्वास ठेवल्याचा आरोप करीत अमेरिकेने संबंध तोडण्याचा इशारा मे महिन्यातच दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका सर्वाथिक आर्थिक मदत देते. त्यात २०१९ मध्ये ब्राझिलनेही जागतिक आरोग्य संघटनेला पैसे देणे बंद केले आहे. ब्राझिलकडे जागतिक आरोग्य संघटनेची ३३ मिलियन डॉलरची थकबाकी आहे. ब्राझिल हा ही कोरोनामुळे सर्वात जास्त बाधितांपैकी एक देश आहे. ब्राझिलमध्ये ६ लाख ४६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. तिथे आजवर ३२ हजारहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. (वृत्तसंस्था)