माद्रिद : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. अनेक देशांत मृत्यूचे अक्षरशः तांडव सुरू आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून मंगळवारी तेथे तब्ब 743 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे कोरोनामुळे मरणारांचा आकडा आता 14,045 वर पोहोचला आहे. या देशात कोरोनाने असे रुप धारण केले आहे, की जिकडे-तिकडे केवळ मृतांचा ढीग दिसत आहे.
'ला अल्मुडेना' ही या देशातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी माद्रिद येथे आहे. या स्मशानभूमीत दर 15 मिनिटाला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जात असल्याचे चित्र आहे. या अंत्यसंस्कारासाठी 5 हून अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. इटलीनंतर स्पेनला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीनंतर येथेच सर्वाधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
26 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन -स्पेनची राजधानी असलेल्या माद्रिद मध्ये सर्वाधिकि म्हणजेच 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या देशात 14 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली होती. त्याचा कालावधी दुसऱ्यांदा वाढवून आता 26 ऐप्रिल करण्यात आला आहे. देशाच्या परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी म्हटले आहे, की आम्ही लोक आता भूयाराच्या शेवटी प्रकाश पाहात आहोत. या देशात कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत 1,40,510 वर पोहोचली आहे.
नवीन कोरोनाबाधितांत 3.3 टक्क्यांची वाढ -येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की गेल्या चार दिवसांत मृतांचा आकडा सातत्याने कमी होता होता. मात्र मंगळवारी तो पुन्हा एकदा अचानक वाढला आहे. तसेच सोमवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 3.3 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय आठवड्याच्या शेवटी झालेल्या मृत्यूंची संख्या उशिराने नोंदवली जाते. यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे.