एअर एशियाची विमानसेवा १ मेपासून पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 03:56 AM2020-04-30T03:56:32+5:302020-04-30T03:56:38+5:30
मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने १ मेपासून आपली प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कौलालंपूर : कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी विविध देशांनी लागू केलेल्या निर्बंधांनंतर काही ठिकाणच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने १ मेपासून आपली प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान प्रवाशांनी तोंडाला मास्क बांधणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मलेशियातील देशांतर्गत, तसेच काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही सेवा पुन्हा सुरू होईल. यासंदर्भात एअर एशियाने म्हटले आहे की, प्रवाशांनी त्यांचे मास्क स्वत: आणायचे आहेत. विमानात चढण्यापूर्वी, विमानात असताना व विमानातून उतरल्यानंतर प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. विमानतळाच्या आत प्रवेश करताना किंवा तेथून बाहेर पडतानाही त्यांनी मास्क लावायला हवा.
यासंदर्भात एअर एशियाचे मुख्य सुरक्षा अधिकारी लिंग लिआँग तिएन यांनी सांगितले की, कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून मलेशिया सरकारने नवीन धोरण अमलात आणले आहे. एअर एशियाच्या विमानांमध्ये या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करण्यात येईल. प्रत्येक प्रवाशाने सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. हे नियम तोडणाऱ्या प्रवाशांवर मलेशिया सरकार कारवाई करणार आहे.
पाच किलोपेक्षा जास्त सामानास बंदी
एअर एशियाने प्रवास करणाºया प्रवाशाला आपल्या सोबत प्रत्येकी पाच किलोपेक्षा जास्त सामान नेता येणार नाही. विमानातही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची दक्षता घेतली जाणार आहे असे एअर एशियाने म्हटले आहे. विमानतळावर तसेच विमानात प्रवेश करण्याआधी प्रत्येक प्रवाशाचे शरीराचे तापमान मोजण्यात येईल. तसेच या विमानातील प्रत्येक कर्मचाºयाला हा नियम लागू असून ते प्रवासादरम्यान पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीइ) परिधान करणार आहेत. तसेच ते तोंडाला मास्क व हातामध्ये ग्लोव्हज घालणार आहेत.