बीजिंग – एअर फ्रान्स(Air France) च्या एका विमानातआग लागल्यानंतर शनिवारी बीजिंगमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. बीजिंगच्या डेली रिपोर्टनुसार, एअर फ्रान्सच्या AF393 बीजिंग पॅरिस या विमानातआग लागल्यानंतर तात्काळ हे विमान बीजिंगला परत बोलावून आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने बीजिंग कॅपिटल इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन शनिवारी उड्डाण घेतलं होतं.
या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही तासांत विमानाच्या मागच्या बाजूस जोरदार स्फोट झाल्याचं ऐकायला मिळालं. त्यानंतर विमानाच्या आतमध्ये सर्वत्र धूर पसरला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील प्रवाशांना काढलेल्या फोटोवरुन विमानाच्या आतमधील काही सीटांचे आगीमुळे नुकसान झाले. एअर फ्रान्सने या दुर्घटनेची पुष्टी करत बीजिंगमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग केल्याचं सांगितले. एअर फ्रान्सनं सांगितले की, विमानाचं टेकऑफ केल्यानंतर १४ मिनिटांत विमानात आग लागली. हे विमान बीजिंगवरुन पॅरिसला चालले होते. विमानात दुर्घटना झाल्याचं आढळल्यानंतर पायलटनं प्रसंगावधान राखत तात्काळ बीजिंगला विमानाचं आपत्कालीन लँडिंग केले. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर ही दुर्घटना घडल्याचं विमानातील क्रू मेंबर्सने सांगितले.
मार्चमध्येही एअर फ्रान्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग
यापूर्वीही मार्चमध्ये पॅरिस ते नवी दिल्ली येणाऱ्या विमानाचं बुल्गारियाच्या सोफिया एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. रॉयटर्सच्या माहितीनुसार, एका भारतीय प्रवासाने विमानात केलेल्या अक्षभ्य वर्तवणुकीमुळे हे विमान लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर तात्काळ या व्यक्तीला विमानातून उतरवण्यात आले. त्या व्यक्तीवर विमान सुरक्षेला धोका पोहचवणारी कलमं लावून गुन्हा नोंदवण्यात आला. सोफिया येथे भारतीय प्रवासाला ७२ तास ताब्यात ठेवलं होतं. त्यानंतर विमानाने तात्काळ नवी दिल्लीसाठी उड्डाण घेतले.
अमेरिकन प्रवाशाने दिली होती विमान क्रँश करण्याची धमकी
जूनमध्ये अमेरिकेतही असाच प्रकार पाहायला मिळाला. जेव्हा लॉस एंजिल्सहून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअरलायन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करायला लागलं. एका प्रवाशाने विमान पाडण्याची धमकी दिली होती. २० वर्षाच्या या प्रवाशाने फ्लाइट अटेंडेंटवर हल्ला केला होता. वारंवार ओरडून विमान क्रॅश करण्याची धमकी तो देत होता. प्रवाशाच्या अशा वागणुकीमुळे विमानात दहशतीचं वातावरण पसरलं त्यानंतर तात्काळ हे विमान पायलटनं आपत्कालीन लँडिंग केले.