माले : मालदीवमधील माली व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धावपट्टीवरच विमान उतरवल्याने एअर इंडियाच्या 136 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, विमानाचे टायर फुटण्यावरच निभावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा प्रकार डीजीसीएने गंभीरपणे घेतला असून दोन्ही वैमानिकांना निलंबित केले आहे.
एअर इंडियाचे एआय 263 हे विमान शुक्रवारी तिरुअनंतपुरमहून मालदीवला पोहोचले. या विमानात 136 प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते. व्हेलाना विमानतळावर नवीन धावपट्टी नुकतीच तयार करण्यात आली आहे. तसेच या धावपट्टीवर सिग्नल आणि लाईटही लावण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या धावपट्टीची साफसफाई करण्यात आलेली नाही.
एअर इंडियाच्या वैमानिकाने या नव्या धावपट्टीला मुख्य धावपट्टी समजून विमान उतरवले. मात्र, विमानाचे दोन टायर फुटले आणि विमान या धावपट्टीवरच अडकून पडले. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे माले पोलिसांनी सांगितले.
सौदीमध्येही असाच प्रकार सौदी अरेबियामध्येही गेल्या महिन्यात भारतीय विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजच्या वैमानिकाने उड्डाण करण्यासाठी धावपट्टी ऐवजी टॅक्सींसाठी असलेल्या रस्त्यावर विमान नेले होते. या विमानात 150 प्रवासी होते.