वॉशिंग्टन - मगर म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. पण सध्या फेसबुकवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर अनेकांचा डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. हा व्हिडीओ अमेरिकेतील एका पार्कातील आहे. अमेरिकेत थंडीने कहर केला असून, पार्कमधील या तलावातील पाणी थंडीमुळे गोठलं आहे. विशेष म्हणजे पाण्यासोबत मगरीदेखील गोठल्या आहेत. व्हिडीओ धक्कादायक तसंच आश्चर्यकारक आहे. बर्फात गोठलेल्या मगरींचा हा व्हिडीओ विचलित करु शकतो. पाण्याचा बर्फ झाला असताना मगरींनी तोंड मात्र बाहेर काढलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ शॅलोट्टे रिव्हर स्वॅम्प पार्कमधील आहे. त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बोलताना ऐकू शकतो. ही व्यक्ती गोठलेल्या पाण्यात मगर जिवंत कशी राहू शकते याबद्दल सांगत आहे. फेसबुकवर या मगरींना 'सर्व्हायवल मशीन' म्हणून संबोधण्यात आलं आहे. पाण्यात गोठलेल्या या मगरी जिवंत आहेत की नाही ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर बोलताना तज्ञांनी सांगितलं आहे की, वातावरणात बदल झाल्यानंतर मगरदेखील त्या बदलात सहजपणे वावरु शकतात. जेव्हा त्यांना वाटतं की पाणी गोठणार आहे तेव्हा त्या आपलं नाक पाण्याबाहेर काढून निद्रावस्थेत जातात. बर्फ वितळेपर्यंत शरिराचं तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न त्या करतात.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या या मगरींना पाहून अनेक प्रश्न विचारले जात आहे. जर एखादी व्यक्ती चुकून मगरीजवळ गेली तर काय होईल ? असा प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना पार्ककडून सांगण्यात आलं की, अशा परिस्थितीत मगर कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी आपलं शरिराचं तापमान योग्य ठेवायचं असल्या कारणाने दुस-या ठिकाणी आपली ऊर्जा ते खर्च करणार नाहीत. लिंडा नावाच्या एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली आहे की, भलेही मगरी माणसांसाठी भीतीदायक असतील, पण त्या स्मार्ट असतात. त्यांची जिवंत राहण्याची कला अदभूत आहे.