प्रयोगशाळेत नेताना 4 माकडे पळाली; माकडांच्या जवळ न जाण्याचा पोलिसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 01:06 PM2022-01-23T13:06:03+5:302022-01-23T13:10:52+5:30
अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात 100 माकडांना संशोधनासाठी प्रयोग शाळेत नेले जात होते, यादरम्यान ट्रकचा अपघात झाला आणि 4 माकडे पळून गेली.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात एका ट्रकला अपघात झाल्याने वैद्यकीय संशोधनासाठी प्रयोगशाळेत नेण्यात आलेल्या 100 पैकी चार माकडांनी पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर आता पोलिसांनी त्या माकडांचा शोध सुरू केला आहे, मात्र लोकांना त्यांच्या संपर्कात येऊ नका, असा इशारा दिला आहे.
पेनसिल्व्हेनियातील डॅनव्हिलजवळ शुक्रवारी दुपारी माकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची डंपरला धडक बसली. माकडांसह हा ट्रक फ्लोरिडा येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत जात होता. पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, या ट्रकमधून चार माकडे अपघाताच्या ठिकाणाहून आजूबाजूच्या परिसरात पळून गेली आहेत.
एका माकडाचा फोटो व्हायरल
यानंतर पोलिसांनी तीन माकडांना पकडले असून, एकजण अद्याप फरार आहे. स्थानिक डब्ल्यूएनईपी न्यूज साइटने सांगितले की थर्मल कॅमेरे असलेल्या पोलिस हेलिकॉप्टरने या माकडाचा शोध सुरू आहे. तर जमिनीवरुन काही अधिकारी शक्तिशाली फ्लॅशलाइट वापरत आहेत. दरम्यान, पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांनी या चारपैकी एका माकडाचा फोटो जारी केला आहे.
संशोधनात होतो माकडांचा वापर
न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, सायनोमोल्गस माकड, ज्यांना लांब शेपटीचे मकाक देखील म्हणतात. अशी माकडे बंदिवासात 30 वर्षांपर्यंत जगू शकतात. या माकडांची किंमत $ 10,000 पर्यंत आहे. या माकडांचा वापर विविध संशोधनात केला जातो. कोरोना संशोधनातही अनेक ठिकाणी या माकडांचा वापर होत आहे. यामुळेच कोरोना लसीच्या संशोधनात या माकडांची मोठी मागणी निर्माण आहे.