कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कोरोना लस हेच जगातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे. साधारणपणे जगातील सर्वच देशांत कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरू आहेत. मात्र, अद्यापही काही लोक असे आहेत, जे या लसींवर संशय घेत आहेत. अथवा, इतर कुण्या कारणांमुळे लस घेण्याची त्यांची इच्छा नाही. अमेरिकेतही असे प्रकार घडत आहेत. यामुळे येथील एका कंपनीने तब्बल 1400 लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हे प्रकरण न्यूयॉर्क स्टेटमधील सर्वात मोठ्या हेल्थकेअर प्रोव्हायडर नॉर्थवेल हेल्थशी (Northwell Health) संबंधित आहे. त्यांनी कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून घरी बसवले आहे. हेल्थकेअरचे प्रवक्ता जो केम्प यांनी यासंदर्भात माहिती सार्वजनिक केली आहे.
नॉर्थवेल हेल्थमध्ये 76 हजार कर्मचारी काम करतात -न्यूयॉर्कमधील नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅलिफोर्नियासह काही इतर राज्यांनीही, असा नियम बनवला आहे. परंतु, नॉर्थवेल हेल्थच्या या कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिल्याने, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली. नॉर्थवेल हेल्थने येथे काम करणाऱ्या सर्व क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल स्टाफसाठी कोरोना लस अनिवार्य केली होती. केम्पने म्हटले आहे, की आमचे लक्ष कर्मचाऱ्यांना काढून टाकणे नव्हते, तर प्रत्येकाला कोरोना लस देण्याचे होते.