न्यूजर्सी : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे प्रथमच आषाढी वारीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. भारतातून सध्या अमेरिकेत आलेल्या तसेच अमेरिकेतील विविध राज्यांत पूर्वीपासून वास्तव्य करून असलेल्या लोकांपैकी ३०० पेक्षा अधिक जण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नामाचा गजर करत वारीमध्ये सहभागी झाले होते.
यूएस सेक्रेड फाऊंडेशनच्या वतीने न्यू जर्सी येथील लँडहर्स्ट येथे उभारलेल्या विठ्ठल मंदिरातील मूर्तीचा गेल्या २१ मे रोजी प्रतिष्ठापना सोहळा भाऊ ऊर्फ भालचंद्र कुलकर्णी, आनंद चौथाई, प्रवीण पाटील यांच्या हस्ते पार पडला होता. त्यानंतर ११ जून ते २९ जून या कालावधीत न्यूजर्सीमध्ये प्रथमच आषाढी वारी आयोजिण्यात आली. या वारीत ४० दिंड्या होत्या. एडिसन येथील एका पार्कमध्ये गोल रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे ६०० भाविक रिंगणात सहभागी झाले. आळंदीहून आणलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून त्या आषाढी वारीबरोबर नेण्यात आल्या होत्या.
भारतातून अमेरिकेत यंदाच्या वर्षी आलेल्यांपैकी अनेकांना आपली वारी चुकणार, असे वाटले होते. मात्र न्यू जर्सीतील वारीमुळे आम्हाला अमेरिकेतच पंढरपूर अवतरल्यासारखे वाटले, अशी प्रतिक्रिया या विठ्ठलभक्तांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)