रशिया-युक्रेन युद्धादरम्यान झेलेन्स्कींचे पत्नीसोबत 'वोग' मॅगझिनसाठी फोटोशूट! सोशल मीडियावर ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:27 PM2022-07-27T20:27:32+5:302022-07-27T20:29:39+5:30
Volodymyr Zelenskyy : या फोटोंमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहेत. एका फोटोत ओलेना युक्रेनियन सैनिकांसोबत दिसत आहेत. यावरून युजर्सनी त्यांना ट्रोल केले.
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरू होऊन जवळपास पाच महिने झाले आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पत्नीसमवेत 'वोग' (Vogue) मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाला पाच महिने झाले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आपल्या देशातील लोकांच्या पाठीशी उभे राहिले. यासाठी त्यांनी देशातील जनतेची वाहवा मिळवली. पण, झेलेन्स्की यांच्या फोटोशूटच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, झेलेन्स्की यांनी वोग या फॅशन मॅगझिनसाठी युद्धाच्या विध्वंसाच्या फोटोमध्ये पोझ दिली आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेनासोबत दिसत आहेत. हे फोटो व्होग मॅगझिनच्या ऑनलाइन आवृत्तीसाठी घेण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये झेलेन्स्की आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहेत. एका फोटोत ओलेना युक्रेनियन सैनिकांसोबत दिसत आहेत. यावरून युजर्सनी त्यांना ट्रोल केले.
Zelenskyy still has time to pose for Vogue? Lol https://t.co/fxXgYhTgwh
— Lerumo la Afrika ✊ (@TshepiiiiM) July 27, 2022
दरम्यान, जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू झाली, तेव्हा झेलेन्स्की यांच्या धैर्याचे आणि शौर्याचे जगभर कौतुक होत होते. असे म्हटले जाते की, प्रसिद्ध व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. तसेच झेलेन्स्की यांच्या कडक वृत्तीच्या मागे त्यांची पत्नी ओलेना यांचा हात असतो. 44 वर्षीय ओलेना या एकेकाळी आपल्या पतीच्या राजकीय कारकिर्दीच्या विरोधात होत्या, परंतु नंतर प्रचारादरम्यान त्यांनी पतीला पाठिंबा दिला. झेलेन्स्की यांच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्या युक्रेनच्या फर्स्ट लेडी म्हणून काम करत आहेत.
झेलेन्स्की आणि ओलेना एकाच शाळेत शिकले आहेत. ओलेना यांनी आर्किटेक्टचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी लेखनातही रस दाखवला आहे. असे म्हणतात की झेलेन्स्की हे राजकारणापूर्वी विनोदी कलाकार होते आणि त्यावेळी त्यांची पटकथा लेखक त्यांची पत्नी ओलेना होत्या. ओलेना या गेल्या अनेक दशकांपासून कधीही चर्चेत आल्या नाहीत. पण, कठीण काळात त्या केवळ आपल्या पतीचीच नव्हे तर युक्रेनमधील लोकांची भावना कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.