अखंड भारतावर पुतिन यांचे गुरू अलेक्झांडर दुगिन यांचा लेख; मोदी सरकार, भाजप, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:15 PM2024-04-22T22:15:40+5:302024-04-22T22:17:04+5:30
दुगिन यांच्या मते, भारत आपल्या डोळ्यांसमोरच एक नवे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे.
रशियाचे राजकीय तत्त्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांनी अखंड भारतासंदर्भात आपले विचार मांडले आहेत. त्यांनी आपल्या या लेखात भारताच्या उदयासंदर्भात रशिया काय विचार करतो हे प्रकट केले आहे. दुगिन यांच्या मते, भारत आपल्या डोळ्यांसमोरच एक नवे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे.
याशिवाय, आज भारतीय वंशाचे लोक संपूर्ण जगात मोठी भूमिका पार पाडत आहेत, असेही दुगिन यांनी लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, पश्चिमेकडील देशांमध्ये अलेक्झांडर दुगिन यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे गुरू मानले जाते. अलेक्झांडर दुगिन यांचे पूर्ण नाव अलेक्सांद्र गेलीविच दुगिन असे आहे. दुगिन फॅसिस्ट विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत, असा आरोपही पश्चिमेकडील देशांकडून केला जातो.
दुगिन यांच्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे -
आर्थिक विकास -
2023 मधील 8.4% GDP वाढीचा विचार करता भारत सध्या जागतिक पातळीवर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे.
जागतिक प्रभाव -
भारतीय वंशाचे लोक जगभरात लक्षणीय प्रभाव पाडत आहेत. सिलिकॉन व्हॅलीसह अनेक प्रमुख क्षेत्रांचे नियंत्रण त्यांच्याकडे आहे. ऋषी सुनक आणि विवेक रामास्वामी सारख्या व्यक्ती ब्रिटन आणि अमेरिकेच्या राजकारणात मुख्य भूमिका बजावत आहेत.
राजकीय बदल -
भारतीय जनता पक्षाने 1996 मध्ये सत्तेवर येत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीर्घकाळाचे वर्चस्व संपवले. आपल्या लेखात त्यांनी भाजपला उजव्या विचारसरणीचा पक्ष तर काँग्रेसला डाव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष म्हटले आहे. एवढेच नाही, तर "हे डाव्या विचारसरणीकडून उजव्या परंपरावादी शासन व्यवस्थेत होत असलेला बदल दर्शवते," असेही त्यांनी म्हटले आहे.
सांस्कृतिक आणि वैचारिक बदल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, INDIA हे नाव बदलून संस्कृतमध्ये "भारत" करण्यात आले आहे. जे पुराणमतवादी आणि पारंपारिक विचारसरणीकडे जाण्याचे संकेत देते.
— Alexander Dugin (@Agdchan) April 21, 2024
बाहेरील विरोध -
अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस सारख्या व्यक्तींनी मोदींच्या धोरणांना विरोध केला आहे. यामुळे भारतामध्ये सामाजिक आणि जातीय तणाव वाढला आहे.
रशियन दृष्टीकोन:
रशिया भारतातील बदल ओळखतो आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत संतुलित संबंध राखण्याचे समर्थन करतो.