अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्रपतींची घोषणा, अशरफ गनींचा फोटो काढून फेकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:47 PM2021-08-18T15:47:16+5:302021-08-18T15:48:22+5:30
सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे.
काबुल - भारतात १५ ऑगस्टला संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करत होता. त्याचदिवशी अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरु होता. तालिबाननंअफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले. त्यानंतर, उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केलं आहे.
सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे. सालेह यांच्या या घोषणेमुळे आता तालिबान चांगलाच संतापला असणार आहे. त्यामुळे, तालिबानच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे.
ताजिकिस्तानच्या दुतावासाने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचं खुलं समर्थन केलं आहे. ताजिकिस्तान अफगाणिस्तानकडून त्रस्त होता, आणि सालेह हेही मूळचे ताजिक आहेत. या घोषणेमुळे तालिबानचा पारा चढण्याची शक्यता आहे. अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी आपण राष्ट्रपती बनल्याची घोषणा केली. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधला. बायडन यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असे त्यांनी म्हटलंय.
Afghanistan’s ambassador in Tajikistan: Amrullah Saleh is our president. pic.twitter.com/Pf7jtqM9Rs
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 18, 2021
सालेह यांनी अफगाणी नागरिकांना तालिबानविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूनंतर उपराष्ट्रपतींकडे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी येते, असे अफगाणिस्तानच्या संविधानात लिहिल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. मी सर्वच नेत्यांशी त्यांच्या समर्थनासाठी संपर्क करणार असल्याचंही सालेह यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
बायडन यांचा अशरफ गनींवर निशाणा
अफगाणिस्तानातील अस्थिरता कमी संपेल याची कुणालाही शाश्वती नाही. अफगाणिस्तान सैनिक लढत नाही मग कधीपर्यंत अमेरिकेचे सैन्य पाठवत राहू असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करत तेथील जनतेला प्रश्न विचारला आहे. अफगाणिस्तानावर तालिबानचा ताबा आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देश सोडून पळालेले अशरफ गनी यांना दोषी ठरवले आहे. देशाच्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं राहण्याऐवजी ते न लढताच पळून गेले अशी टीका बायडन यांनी केली आहे.