नवाज शरीफ यांच्यावर आणखी एक खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:06 AM2017-10-21T03:06:25+5:302017-10-21T03:08:12+5:30
पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले.
इस्लामाबाद: पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले. हे प्रकरण फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि दुसºया विदेशी कंपन्यांशी संबंधित आहे. न्यायालयाने शरीफ यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आणि त्यांचे वकील जाफीर खान यांना ते वाचून दाखविले. नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोने गेल्या ८ सप्टेंबरला शरीफ यांच्याविरुद्ध काळा पैसा पांढरा करणे आणि भ्रष्टाचाराचे जे तीन गुन्हे दाखल केले होते त्यापैकी हे एक प्रकरण आहे. पनामा पेपर्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरविल्यानंतर या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
न्यायमूर्ती मोहम्मद बशीर यांनी आरोपपत्र वाचल्यानंतर अॅड. खान यांनी शरीफ यांच्या वतीने युक्तिवाद करताना ते निर्दोष असल्याचा दावा केला. शरीफ हे त्यांची पत्नी कुलसुम नवाज यांच्यासोबत सध्या लंडनला वास्तव्यास आहे. कुलसुम नवाज यांना घशाचा कर्करोग असून त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ते रविवारपर्यंत परतण्याची शक्यता आहे. या तीनही प्रकरणात शरीफ यांचे पुत्रद्वय हसन आणि हुसेन हे सुद्धा सहआरोपी आहेत. परंतु त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालविला जाईल. (वृत्तसंस्था)