न्यूयॉर्क - जगभरातील नेटीझन्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकने काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. अब्जावधी फेसबुक युजर्संचा श्वासच काही काळासाठी रोखला की काय, अशीच अवस्था झाली होती. फेसबुक ओपन करताच केवळ बफरींग होत असल्याने फेसबुक बंद पडले की काय अशी चर्चा सर्वत्र नकळत सुरू झाली. तर फेसबुक अकाउंटवर sorry something wrong असा मेसेजही दिसत होता. त्यामुळे ट्विटरवरही फेसबुक बंदबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
फेसबुक बंदची समस्या केवळ भारतातच नव्हती, तर जगभरातील फेसबुक काही मिनिटांसाठी बंद पडले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री दहाच्या सुमारास ब्राझील, अमेरिका, ब्रिटन, मध्य-पूर्व, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक बंद पडल्याचा अनुभव युजर्सना आला. त्यानंतर भारत, जर्मनी, फ्रान्स आणि हॉलंडमध्येही असाच अनुभव आला. काही वेळातच थायलंड, कॅनडा, फिलिपिन्स, पोलंड, दक्षिण कोरिया, नेदरलँड्समध्येही हे जाणवले. त्यामुळे ही समस्या केवळ काही देशांपुरतीच नसून सगळीकडेच फेसबुक बंद पडल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, काही वेळांतच म्हणजे 10 ते पंधरा मिनिटांत भारतातील फेसबुक पूर्ववत झाले आहे. तरीही खबरदारी म्हणून प्रत्येकाने आपले फेसबुक अकाऊंट तपासून घेणे गरजेचे आहे.