रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने केली हिंदूंची हत्या- अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:58 AM2018-05-23T11:58:52+5:302018-05-23T15:05:13+5:30
अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने हिंदूंवर हल्ले केल्याची माहिती उघड झाली आहे.
सॅन फ्रॅन्सिस्को- गेले वर्षभर रोहिंग्या बंडखोरांचे गट आणि म्यानमार लष्कर यांच्यामध्ये झालेल्या तणावामुळे बांगलादेश व म्यानमारमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. म्यानमारच्या सशस्त्र दलांकडून रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांवर अत्याचार झाले असे सांगण्यात येत असले तरी आता अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालातून नवी माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे सोमवारी उघड झालेल्या एका घटनेमध्ये बांगलादेशातून रोहिंग्या मणिपूरमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंफाळमध्ये पोलिसांनी 8 रोहिंग्यांना पकडले असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्डही होते.
अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी या रोहिंग्यांच्या सशस्त्र गटाने सुमारे 99 हिंदू पुरुष-महिला आणि मुलांची हत्या केल्याचे अॅम्नेस्टीने स्पष्ट केले आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने केलेल्या हत्या व अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे. या हल्ल्यांमधून वाचलेल्या लोकांवर या घटनांचा अत्यंत खोलवर परिणाम झालेला आहे. असे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या तिराना हसन यांनी सांगितले.
म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या बंडखोरांनी पोलिसांच्या चौक्यांवर हल्ले केल्यानंतर म्यानमार लष्कराने रोहिंग्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचे म्यानमार सरकारने समर्थनही केले होते. या मोहिमेत हजारो निरपराधांवर अत्याचार, बलात्कार करण्यात आले. हजारो रोहिंग्यांची घरे जाळण्यात आली तर लक्षावधी रोहिंग्यांना आपली घरेदारे सोडून पलायन करावे लागले. यामुळे रोहिंग्यांच्या स्थलांतराची मोठी समस्या निर्माण झाली होती.
बांगलादेशातील छावणीत प्रतिदिन 60 रोहिंग्या बालकांचा जन्म
हजारो रोहिंग्या गर्भवती बांगलादेशातील आश्रय छावण्यांमध्ये प्रसूत होणार आहेत त्यातील बहुसंख्य महिलांवर गेल्या वर्षीच्या अत्याचारांच्या मालिकेत बलात्कार झाले आहेत. ऑगस्ट 2017 पासून 7 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. यांमध्ये 81 हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून संयुक्त राष्ट्राच्यामते गरोदर महिला व मुलींची संख्या 40 हजारच्या आसपास असावी.
इस्लामिक रिलिफ कॅनडा या संस्थेच्या संचालक डॉ. फारिहा खान यांनी याबाबत सांगितले, "म्यानमारमध्ये गेल्या वर्षी रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. यामध्ये बहुतांश सर्व महिलांवर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचाराच्या खुणा आहेत. म्यानमारची सशस्त्र दले रोहिंग्या महिलांना एका रांगेत उभं करत आणि हव्या त्या महिलेवर बलात्कार करत अशा प्रकारे अत्यंत वाईट अत्याचार येथे महिलांवर झाले आहेत."
रोहिंग्या छावणीमधील फातेमा नावाच्या 16 वर्षांच्या मुलीच्या नवऱ्याला या अत्याचारांमध्ये ठार मारण्यात आले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आता ती गर्भवती असून, होणारे बाळ कोणाचे आहे हे सुद्धा तिला माहिती नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणते," ते जर माझ्या नवऱ्याचे मूल असेल तर ते त्याच्यासारखे दिसेल जर दुसऱ्या कोणाचे असेल तर ते त्या माणसासारखे दिसेल. पण ते माझे बाळ असल्यामुळे मी त्याच्यावर प्रेमच करेन."
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे. या वर्षभरामध्ये 16 हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी 25 हजार बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.