बायडन यांच्या शपथविधीसाठी वॉशिंग्टनमध्ये बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:04 AM2021-01-15T02:04:06+5:302021-01-15T02:04:56+5:30
गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला केला होता. आताही बायडेन यांचा शपथविधी सोहळा अवघ्या आठवडाभरावर आला असताना या सोहळ्यात ट्रम्प समर्थक विघ्न आणणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे
वॉशिंग्टन : मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात संसदेवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बायडेन यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी होणार आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला केला होता. आताही बायडेन यांचा शपथविधी सोहळा अवघ्या आठवडाभरावर आला असताना या सोहळ्यात ट्रम्प समर्थक विघ्न आणणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये आतापासूनच कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. व्हाइट हाउसपासून नजीकच असलेल्या कॅपिटॉल परिसरात मोठमोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत तसेच व्हाइट हाउस परिसर सील करण्यात आला.
शपथविधीच्या दिवशी ट्रम्प समर्थक ५० राज्यांत निदर्शने करणार असल्याची माहिती एफबीआयच्या हाती लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बाऊझर यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्यासाठी कोणीही कोलंबिया जिल्ह्यात येऊ नये, असेही आवाहन लोकांना करण्यात आले असल्याचे महापौरबाईंनी स्पष्ट केले.
दुकाने, शॉपिंग मॉल्स आठवडाभरासाठी बंद
शहरातील गर्दीची ठिकाणे, उपाहारगृहे, दुकाने, शॉपिंग मॉल्स आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आले असल्याचेही बाऊझर यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्यात आम्हाला कोणताही अनुचित प्रकार नको असून, त्यासाठी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. अध्यक्षांचा शपथविधी सोहळा साधेपणाने होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.