बीजिंग- डोकलाम वादानंतर आता भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश हे पुढच्या मोठ्या वादाचं कारण ठरू शकतं. भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री गेंग शुआंग यांनी अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पीपल लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं घुसखोरी केली होती. त्यावर चीन बोलायला तयार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चिनी सैनिक भारताच्या अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात 200 मीटरपर्यंत आत घुसले होते. या घटनेनंतर गेंग शुआंग म्हणाले, सीमेच्या वादावर आमची भूमिका नेहमी स्पष्ट असते. आम्ही कधीही अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व स्वीकारलेलं नाही. परंतु तुम्ही ज्याबाबत बोलत आहात, त्याची मला काही माहिती नाही. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आहे. चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्करानं यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.चीन आणि भारताच्या सीमेसंबंधी वाद सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची प्रणाली विकसित आहे. या प्रणालीअंतर्गत चीन आणि भारत सीमा वादाशी संबंधित प्रकरणं सोडवू शकतो. सीमेवर शांतता प्रस्थापित करणं हे चीन आणि भारत दोघांसाठीही गरजेचं आहे, असंही गेंग शुआंग म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन महिन्यांपूर्वी सिक्कीममधील भारत आणि चीन सीमेजवळील नथू ला भागाचा दौरा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.
अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:14 PM