इराकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर इराकमध्ये एका लग्न समारंभात लागलेल्या आगीत जवळपास १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये वधू-वरांचाही समावेश आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, इराकच्या उत्तर निनेवेह प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात आयोजित लग्न समारंभात मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही आग लागली.
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र फटाके उडवल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेतील जखमींना निनवेह भागातील रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांची संख्या ११३ असल्याचे निनेवेहचे डेप्युटी गव्हर्नर हसन अल-अल्लाक यांनी सांगितले. तर इराकी न्यूज एजन्सी नीनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अग्निशामक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावरील स्थानिक पत्रकारांनी हॉलचे आग लागलेले फोटो शेअर केले आहेत. "अत्यंत ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळे आग लागल्याने हॉलचा काही भाग कोसळला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली", असे इराकच्या नागरी संरक्षण संचालनालयाने सांगितले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, वैद्यकीय पथके दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, इराकच्या पंतप्रधानांनी अधिकार्यांना "दुर्दैवी घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत" असे सांगितले. त्यांच्या कार्यालयाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. याशिवाय, या घटनेनंतर अनेक लोक जखमींना मदत करण्यासाठी तसेच रक्तदान करण्यासाठी प्रदेशाची राजधानी मोसुलच्या पूर्वेकडील शहर हमदानियाह येथील मुख्य रुग्णालयात पोहोचले आहेत.