सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 01:12 AM2024-12-01T01:12:10+5:302024-12-01T01:13:08+5:30
चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात भेटण्यासाठी गेले असता श्याम दास प्रभू यांना कुठल्याही अधिकृत वॉरंटशिवाय अटक करण्यात आली असल्याची माहिती संघटनेने शनिवारी दिली.
बांगलादेशातहिंदूंवर होणारे अत्याचार सातत्याने वाढतच चालले आहेत. अध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर आता पोलिसांनी आणखी एका हिंदू नेत्याला अटक केल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आणखी एक इस्कॉनचे सदस्य श्याम दास प्रभू यांना अटक करण्यात आली आहे. चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात भेटण्यासाठी गेले असता श्याम दास प्रभू यांना कुठल्याही अधिकृत वॉरंटशिवाय अटक करण्यात आली असल्याची माहिती संघटनेने शनिवारी दिली.
न्यायालयाने जामीन नाकारला? -
यासंदर्भात, इस्कॉन कोलकात्याचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "चटगाव पोलिसांनी आज आणखी एका ब्रह्मचारी श्री श्याम दास प्रभू यांना अटक केली." याशिवाय, बांगलादेशातील भैरब येथे आणखी एका केंद्रात तोडफोड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. इस्कॉन बांगलादेशचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना या आठवड्याच्या सुरुवातीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. मात्र, त्याच्या अटकेनंतर बांगलादेशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली.
भारताने तीव्र आक्षेप नोंदवला -
चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी बांगलादेशातील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांना राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून ते अजूनही तुरुंगात आहे. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना जामीन नाकारण्यात आला. बांगलादेशने इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने ही बाब गंभीर चिंतेची असल्याचे म्हणत, शेजारील देशाला हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.