अत्याचार दडपणारा धर्मगुरू दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:09 AM2018-05-23T00:09:08+5:302018-05-23T00:09:08+5:30
अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; चार दशकानंतर लागला निकाल
न्यूकॅसल (आॅस्ट्रेलिया) : सिडनी शहराच्या उत्तरेस हंटर व्हॅली भागातील चर्चमध्ये एका धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पोलिसांना न कळविता दडपून टाकल्याबद्दल येथील न्यायालयाने अॅडलेडचे आर्चबिशप फिलिप विल्सन यांना दोषी ठरविले. बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यासाठी दोषी ठरणारे विल्सन हे रोमन कॅथलिक चर्चचे जगातील सर्वात उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
फादर जेम्स फ्लेचर यांनी १९७० च्या दशकात केलेल्या लैंगिक अत्याचारांशी संबंधित हे प्रकरण आहे. दंडाधिकारी रॉबर्ट स्टोन यांनी ६४ वर्षांचे आर्चबिशप विल्सन यांना दोषी ठरविणारा निकाल जाहीर केला. शिक्षेचा निकाल ९ जून रोजी दिला जाईल. तोपर्यंत विल्सन यांना जामीन मंजूर केला गेला.
लैंगिक अत्याचार झाले तेव्हा ही मुले अनुक्रमे १० व ११ वर्षांची होती. पापाची कबुली देण्यासाठी आपण एकटेच धर्मवेदीपाशी गेलो तेव्हा फादर फ्लेचर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी साक्ष या दोघांनी न्यायालयात दिली. या घटना घडल्या, तेव्हा या मुलांच्या कुटुंबीयांनी चर्च प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्या दडपल्या गेल्या. अॅडलेड धर्मक्षेत्राचे प्रमुख या नात्याने याबद्दल आर्चबिशप विल्सन यांना दोषी ठरविले गेले. (वृत्तसंस्था)
चिलीतील सर्व बिशपचे राजीनामे
चिलीमध्ये बिशपकडून असे प्रकार घडल्याचे लक्षात येताच पोप फ्रान्सिस यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यात सारी प्रकरणे दडपून टाकण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचे आढळून आल्याने पोपनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर देशातील सर्व म्हणजे ३४ बिशपनी राजीनामे दिले. आता नवे चांगले बिशप यावेत आणि यांना धर्मात कोणतेही स्थान असू नये, असे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले आहे.