बगदाद : अमेरिकेने इराणच्या लष्कर प्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करून ठार केले. यामुळे इराण संतप्त झाला असून जग युद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेने केलेला हा हल्ला भ्याड असून दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया इराणकडून आली आहे. तर अमेरिकेतही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
अमेरिका- इराणदरम्यान तणावाचे वातावरण गेल्या दोन वर्षांपासून आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या सुलेमानीचा खात्मा केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत.
सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेने या कारवाईचे स्वागत करताना सुलेमानी इराकमधील अमेरिकी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचे कट रचत होता. यामुळे त्याला अमेरिकेच्या लष्कराने आत्मसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईत ठार केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात इराकच्या एका संघटनेचा म्होरक्या अबू महदी अल मुहादिन याच्यालसह अन्य पाच जण ठार झाले आहेत.
या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना इराणने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री जावद झरीफ यांनी सांगितले की, अमेरिका जागतिक दहशतवादी असल्यासारखे वागत आहे. अमेरिकेला याची जबाबदारी घ्यावीच लागेल. सुलेमानीवरील हल्ला हा अमेरिकेने केलेली घोडचूक आणि धोक्याचे आहे.
इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याचे समजते.