हल्लेखोराने ‘तो’ सेल्फी व्हॉटस् अॅपने पाठविला
By admin | Published: June 28, 2015 11:37 PM2015-06-28T23:37:22+5:302015-06-29T11:59:20+5:30
फ्रान्समधील एका गॅस कारखान्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे धडापासून मुंडके अलग केलेल्या शवासोबत ‘सेल्फी’ काढून क्रूरतेचा कळस गाठला.
पॅरिस : फ्रान्समधील एका गॅस कारखान्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे धडापासून मुंडके अलग केलेल्या शवासोबत ‘सेल्फी’ काढून क्रूरतेचा कळस गाठला. या अमानवी हत्येबद्दल खुद आरोपीनेच सेल्फी कबुली दिली आहे.
तपासाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, यासिन सालही (३५) याने हत्येशी संबंधित ‘परिस्थितीबाबतही माहिती’ दिली आहे. आरोपीला चौकशीसाठी पॅरिस येथे दहशतवादविरोधी पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे.
सुरक्षा विभागाच्या सूत्रांनुसार या हल्ल्यामागचा संशयित यासीन सल्ही याने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून हा भयानक ‘सेल्फी’ कॅनडीतील मोबाईल फोननंबरवर पाठविल्याचे उघडकीस आले आहे. हा क्रूर ‘सेल्फी’ कोणाला पाठविण्यात आला, हा मोबाईल कोणाचा, याचा कसून तपास केला जात आहे. अशावेळी सालहीचा कबुलीनामा आला आहे. अनेक तासांच्या मौनानंतर सालहीने हल्ल्याबाबत तपासकर्त्यांना माहिती देण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी या संशयिताने या कारखान्यातील ज्वलनशील द्रवपदार्थाच्या गोदामावर ट्रक घुसवत भीषण स्फोट घडवून आणला. तसेच हेर्वे कॉर्नरा यांचा शिरच्छेद करून कारखान्याच्या मुख्य दरवाजावर कार्नरा यांचे मुंडके लटकावले होते. तसेच इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा झेंडाही सोबत फडकत होता. कार्नरा त्याचे साहेब होते. (वृत्तसंस्था)
कुवेतमधील आत्मघाती हल्लेखोर सौदी नागरिक
> कुवेत सिटी : शुक्रवारी येथील मशिदीवर आत्मघाती हल्ला करणारा सौदी नागरिक असल्याचे उघड झाले असून त्याचे खरे नाव फहद सुलेमान अब्दुलमोहसीन अल-काबा असे असल्याचे वृत्त कुवेतच्या गृहमंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आले आहे.
> या भीषण हल्ल्यात २६ जण ठार, तर २२७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संलग्नित सौदीतील संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या आत्मघाती हल्लेखोराची ओळख अबू सुलेमान अल-मुवाहीद असे सांगण्यात येते.
> तथापि, याचे खरे नाव फहद सुलेमान अब्दुलमोहसीन अल-काबा असे असल्याचे कुवेती वृत्तसंस्थेने म्हटले आहे. फहद हा शुक्रवारी पहाटेच कुवेतमध्ये दाखल झाला होता. विमानतळावरून मशिदीपर्यंत त्याला घेऊन येणाऱ्या कार चालकाला सुरक्षा विभागाने अटक केली असून त्याचे नाव अब्दुल रहमान सबाह इदन आहे.