‘भारतीयांवरील हल्ले मान्य नाहीत’; व्हाईट हाऊसमध्ये सुरक्षेवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:55 AM2024-02-17T07:55:04+5:302024-02-17T07:56:09+5:30
आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावरही हल्ला झाला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीयांवरील हल्ल्यांत मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर वंश, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर हिंसाचार अमेरिकेत मान्य नाही, अशी भूमिका व्हाइट हाऊसने जाहीर केली आहे. गेल्या एका महिन्यात चार भारतीयविद्यार्थी आणि तीन भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावरही हल्ला झाला आहे.
व्हाइट हाऊसमधील अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन हे हल्ले रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. किर्बी यांना भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले आणि त्यांच्या मुलांना अमेरिकेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये असलेल्या चिंतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘अमेरिकेत वंश, लिंग, धर्म किंवा हिंसाचाराचे कोणतेही कारण अजिबात मान्य नाही.’
घडलेल्या घटना
n १५ फेब्रुवारी : अलाबामा येथे हॉटेलमालक प्रवीण रावजीभाई पटेल यांची ग्राहकाकडून हत्या.
n ४ फेब्रुवारी : शिकागोमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला.
n ४ फेब्रुवारी : एका उद्यानात समीर कामथ नावाच्या भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.
n २ फेब्रुवारी : भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डीचा ओहायोमध्ये मृत्यू झाला.