खलिस्तानी दहशतवादी आणि शिख फॉर जस्टीसचा नेता गुरपतवंत सिंग पन्नूला ठार मारण्याचा प्रयत्न विफल केल्याचा दावा अमेरिकेने गेल्या आठवड्यात केला होता. तसेच भारताला इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणात अमेरिकेने एका भारतीय नागरिकाविरोधात आरोप असल्याची माहिती मॅनहॅटन येथील अमेरिकेच्या अॅटर्नी ऑफिसने बुधवारी जाहीर केले.
निखिल गुप्ता नामक व्यक्तीला झेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांनी जूनमध्ये अटक केली होती. तो प्रत्यार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. गुरपतवंत सिंग पन्नूला ठार मारण्याचा कट न्यू यॉर्क शहरातच रचण्यात आल्याचा दावा मॅनहॅटनमधील सर्वोच्च फेडरल अभियोक्ता डॅमियन विल्यम्स यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे निज्जरच्या कॅनडातील हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावाही अमेरिकेच्याच सांगण्यावरून कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता. यानंतर दोन महिन्यांनीच अमेरिकेने हे आरोप केले आहेत.
पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. विल्यम्स यांनी गुप्ता यांचे नाव यावेळी घेतलेले नाही, परंतू त्यांनी भारतीय नागरिकाचा उल्लेख केला. गेल्या आठवड्यात भारताला राजनैतिक इशाऱ्या व्यतिरिक्त, यूएस फेडरल अभियोजकांनी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात कमीतकमी एका संशयिताविरुद्ध सीलबंद आरोपही दाखल केले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारताने या प्रकरणातील सर्व संबंधित पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पन्नू हा शीख अतिरेकी असून त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे नागरिकत्व आहे. भारतीय तपास यंत्रणा विविध दहशतवादाच्या आरोपाखाली त्याचा शोध घेत आहेत.