मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्युमुखी पडले आहेत. आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. आगीत होरपळलेल्या प्राण्यांचे व्हायरल फोटोने अनेकांचे ह्रदय पिघळले. सोशल मीडियावर असे ह्रदयद्रावक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. त्यातच, एका गंभीर जखमी कोआला प्राण्याचा फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये आपल्या आईला बिलगलेल्या कोआलाचं पिल्लू दिसत आहे. जखमी कोआला मादीवर उपचार करण्यात येत होते. मात्र, अग्नितांडवामुळे भयभीत झालेल्या काओला मादीच्या पिल्लाने आईचे ऑपरेशन होईपर्यंत तिला सोडलेच नाही. उपचार करतेवेळी डॉक्टरांनी त्या पिल्लाला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याने आईला घट्ट सोडलेच नाही. आपल्या आईच्या कुशीत बसलेलं हे पिल्लू पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ऑस्ट्रेलियातील वन्यजीव रक्षकांनी या कोआला मादीचे नाव लिजी आणि तिच्या पिल्लाचे नाव फँटम ठेवले आहे.
आगीच्या दुर्घटनेवेळी स्वत:ची जीव वाचविण्यासाठी जंगलातून धावताना या कोआला मादीला कारची धडक बसली होती. या अपघातानंतर लिजी अन् फँटम यांना प्रसिद्ध वन्यजीव रक्षक स्टीव इरविन यांच्या वाईल्डलाईफ रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी लिजीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी, आगीपासून आपल्या पिल्लाला वाचविणाऱ्या फँटमने आईला थोडावेळही स्वत:पासून वेगळं होऊ दिलं नाही. जनावरांमधील आई-मुलाचं हे नातं पाहून रुग्णालयातील डॉक्टरही गहिवरले. नकळत, या डॉक्टरांचेही डोळे पाणावले. दरम्यान, या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींनी देवाचा धावा केला. नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावी म्हणून प्रार्थना केली. या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं. पावसाच्या आगमनाने तेथील प्राणी, पक्षी अन् जगभरातील मनुष्य सुखावला आहे.