बँकॉक- थायलंडमधील एका गुहेमध्ये फुटबॉल खेळणारे 12 खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक अडकले आहेत. उत्तर थायलंडमध्ये असणाऱ्या या गुहेत अडकलेल्या खेळाडूंना वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
हे सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षे या वयोगटामधील आहेत. चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहात आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले. ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.या गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो असे बँकॉक पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र पावसाळ्यात याच प्रवाहामुळे गुहेत जाणे अशक्य होते. पावसाळ्याचे जून ते ऑक्टोबर हे पाच महिने या प्रवाहाला पूर आला तर पाच मीटर्स म्हणजे 16 फूट पाणी गुहेत साचू शकते असे पोलीस कर्नल कोम्सान सार्दलुआन यांनी सांगितले.
या 12 जणांबरोबर त्यांचा 25 वर्षांचा प्रशिक्षकही असून त्यांनी शनिवारी दुपारी गुहेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ते गुहेतच अडकलेले आहेत. ते सापडले नसल्याची तक्रार आल्यानंतर शनिवारी रात्री त्यांच्या तपासासाठी मोहीम सुरु करण्यात आली. त्यांच्या सायकल्स आणि खेळाचे साहित्य गुहेच्या बाहेर सापडले आहे. रॉयल थाई नेव्हीचे अंडरवॉटर डिमॉलिशन अॅसॉल्ट युनिटचे पाणबुडे या मुलांचा शोध घेत असल्याचे संरक्षण मंत्री जनरल प्रवित वोंगसुवन यांनी स्पष्ट केले आहे.