चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी; कोरोना बळींची संख्या ५६, आजाराच्या विळख्यात १७ शहरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:25 AM2020-01-27T05:25:56+5:302020-01-27T05:30:01+5:30
चीनच्या कृषी मंत्रालय, व्यापार नियमन प्रशासन आणि राष्ट्रीय वन आणि वन्यभूमी प्रशासनाने ही बंदी आणली.
बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे राष्टÑीय पातळीवर पसरलेल्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने वन्यप्राण्यांच्या व्यापारावर तात्पुरती बंदी आणली आहे. चीनमध्ये अन्न म्हणून वन्य प्राण्यांच्या मांसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळविण्यात येईपर्यंत सर्व वन्यप्राण्यांची विक्री आणि वाहतुकीवर बंदी राहणार असल्याचे सरकारने एका आदेशात म्हटले आहे.
चीनच्या कृषी मंत्रालय, व्यापार नियमन प्रशासन आणि राष्ट्रीय वन आणि वन्यभूमी प्रशासनाने ही बंदी आणली. दरम्यान कोरोना विषाणूंमुळे पसरलेल्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५६ झाली आहे. १९७५ जणांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी ३२४ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा नव्या प्रकारचा न्यूमोनिया गणला जात असून २०१९ -एनसीओव्ही असे त्याचे नाव असल्याचे राष्टÑीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. चीनमध्ये आतापर्यंत २६८४ संशयित रुग्णांची नोंद झाली असून हुबेई प्रांतातील वुहान आणि अन्य १७ शहरांमध्ये या आजाराचे केंद्र आहे. बीजिंगसह विविध शहरांमध्ये हळहळू हा विषाणूजन्य आजार पसरत आहे.
२५ जानेवारीपर्यंत हुबेई प्रांतात १०५२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी १२९ जणांची प्रकृती गंभीर आहे. चीनचे सर्वात मोठे शहर असलेले शांघायमध्ये ४० रुग्णांची नोंद झाली आहे. (वृत्तसंस्था)
स्थिती गंभीरच-जिनपिंग
देशात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली स्थिती गंभीर असल्याची कबुली अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे. या विषाणूमुळे पसरलेल्या आजाराविरुद्ध सुरू असलेली लढाई आम्ही जिंकूच, असेही ते ठामपणे म्हणाले. दरम्यान चीनमध्ये या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वुहानमध्ये येत्या १५ दिवसामध्ये तात्पुरते १३०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्या १ हजार बेडचे हॉस्पिटल उभारले जात असून त्याचे काम दहा दिवसात पूर्ण होईल.
अमेरिकेतही लागण
कोरोना विषाणूची लागण हळूहळू जगभरात होत आहे. हाँगकाँग, मकाऊ,तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह अमेरिकेत रुग्ण आढळले असून शुक्रवारी जपानमध्ये रुग्णाची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्दी- पडसे होऊन या आजाराची लागण होते. सिव्हियर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोममुळे (सार्स) रुग्ण दगावतो. कॅनाडामधील एका रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण दाखल झाला असून त्याबाबत अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आला आहे.
भारतीयांच्या आरोग्याबाबत निगराणी- जयशंकर
नवी दिल्ली : बीजिंगमधील भारतीय दूतावास भारतीयांच्या आरोग्याबाबत सातत्याने निगराणी ठेवून असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केले. चीनने भारतीय दूतावासात हेल्पलाईन सुरू केली असून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे, असे ते म्हणाले. दरम्यान भारतीय दूतावासाने केलेले टिष्ट्वट रिटिष्ट्वट करीत जयशंकर यांनी उपाययोजनांची माहिती दिली.