बांगलादेशमध्ये उंच इमारतीला भीषण आग; 17 ठार, 70 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 09:35 PM2019-03-28T21:35:08+5:302019-03-28T21:35:34+5:30
आग नियंत्रणात आली असून अग्नीशामक दलाने मोठ्या प्रयत्नांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
ढाका : बांगलादेशमधील एका उंच इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जण ठार तर 70 जण जखणी झाले आहेत. अनेकजण या इमारतीमध्ये अडकून पडले होते. काही तासांनी त्यांना बाहेर काढण्यात यश आल्याचे ढाका पोलिसांनी सांगितले.
आग नियंत्रणात आली असून अग्नीशामक दलाने मोठ्या प्रयत्नांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्याचे नागरी सुरक्षा उपसंचालक देबुशीस बर्धन यांनी सांगितले.
ढाकामधील बनानी जिल्ह्यातील एफआर टॉवरला ही आग लागली होती. या भागात इमारती बांधताना सर्रास नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे आग लागल्यानंतर इमारतीमधील कोल बाहेर पडू शकले नाहीत. यामुळे 17 ठार तर 70 जण जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका तरुणाने या आगीची भीषणता फेसबुकवर लाईव्ह केली होती. रॉय पिनाकी याने काढलेल्या व्हिडिओमध्ये चार जण बचावासाठी खिडकीवर लोंबकळत असल्याचे दिसत होते. यापैकी एकजण त्यांनी आधारासाठी पकडेलेली दोरीवरून घसरून खाली पडताना दिसला.
लष्कराच्या हेलिकॉप्टरनी बचावकार्यात भाग घेतला. यावेळीही एक जण धुरामुळे हेलिकॉप्टरमधून पडून छतावर कोसळला. डझनभर लोकांना छतावरून खाली उतरविण्यात आल्याचे बर्धन यांनी सांगितले. यावेळी हायड्रॉलिक क्रेनचाही वापर करण्यात आला.