बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरूंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:34 PM2018-10-29T14:34:54+5:302018-10-29T14:36:32+5:30
बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या 1991-96 आणि 2001 ते 2006 या कालावधीत पंतप्रधान होत्या.
ढाका - बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील घोटाळ्याप्रकरणी खलिदा झिया यांच्यासह आणखी तिघांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तसेच 10 लाख रुपयांचा दंडही ठोठवला असून दंड न भरल्यास 6 महिन्यांचा अधिक कारावास ठोठावण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे झिया यांना यंदाच्या डिसेंबर महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नाही.
बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात ‘बीएनपी’च्या अध्यक्ष असलेल्या बेगम खलिदा झिया या 1991-96 आणि 2001 ते 2006 या कालावधीत पंतप्रधान होत्या. सन 2001 ते 2006 या काळात बेगम झिया यांनी आपल्या झिया अनाथाश्रम ट्रस्टसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी जमा केली. त्यातील परदेशी देणग्यांपैकी 21 दशलक्ष रुपयांचा घोटाळा (सुमारे 1 कोटी 70 लाख रुपये) केल्याचा ठपका झिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. झिया यांच्यावरील हा खटला रद्द करण्यासाठी झिया यांनी बांग्लादेश सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि ढाका विशेष न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले. झिया यांना ढाका विशेष न्यायालयाने 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, भ्रष्टाचारविरोधी आयोगाने ही 2011 मध्ये झिया यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला होता.
Former Bangladesh Prime Minister Khalida Zia and three others were sentenced to seven years in prison in connection with Zia Charitable Trust graft case
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2018
Read @ANI story | https://t.co/4YCyFRRxhJpic.twitter.com/X8K3TYY8pX