जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांचे घटस्फोटा नंतरही पहिले स्थान कायम आहे. अशातच दुसऱ्या क्रमांकावर असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना बर्नाल्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकले आहे.
लक्झरी साहित्य बनविणारी कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नाल्ड अरनॉल्ट (70) यांची संपत्ती 7.45 लाख कोटी झाली असून गेट्स यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले आहे. बर्नाल्ड यांच्या कंपनीचे समभाग मंगळवारी 1.38 टक्क्यांनी वाढले. यामुळे त्यांच्या संपत्तीतही कमालीची वाढ झाली. बिल गेट्स यांच्याकडे 7.38 लाख कोटींची संपत्ती आहे.
गेट्स हे ब्ल्यूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. या इंडेक्समध्ये जगातील 500 श्रीमंतांची यादी दररोज अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यावर अद्ययावत केली जाते. या यादीनुसार बर्नाल्ड यांच्या संपत्तीत यंदा सर्वाधिक 2.69 लाख कोटींची वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती फ्रान्सच्या जीडीपीच्या तीन टक्के आहे.
बर्नाल्ड यांच्याकडे एलव्हीएमएच कंपनीचे 50 टक्के शेअर आहेत. तसेच फॅशन हाऊस ख्रिश्चन डायरचे 97 टक्के शेअर्स आहेत. फ्रान्सच्या नोट्रे डॅम कॅथेड्रल चर्चला आग लागली होती. यावेळी त्यांनी मदत म्हणून 65 कोटी डॉलर दिले होते. तर गेट्स यांनी आतापर्यंत 35 अब्ज डॉलर दान केले आहेत. बेजोस यांनी घटस्फोटावेळी पत्नीला 36.5 अब्ज डॉलरचे समभाग दिले आहेत.