संचालकपदाचं काय घेऊन बसलात ट्विटरच विकत देता का बाेला?, तीन लाख कोटी देताे... इलॉन मस्कची सणसणीत ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:44 AM2022-04-15T05:44:59+5:302022-04-15T05:45:05+5:30
जगाला कायम कोणत्या ना कोणत्या निर्णयाने आचंबित करणारे जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांनी पुन्हा एक 'आश्चर्याचा बॉम्ब' टाकला.
न्यूयॉर्क :
जगाला कायम कोणत्या ना कोणत्या निर्णयाने आचंबित करणारे जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांनी पुन्हा एक 'आश्चर्याचा बॉम्ब' टाकला. ज्या ट्विटरने त्यांना संचालकपदाची ऑफर देऊ केली होती, ती अख्खी कंपनीच विकत घेण्याची तगडी ऑफर इलॉन यांनी दिली आहे.
टेस्लाचे संस्थापक असलेल्या इलॉन मस्क यांनी यासाठी सुमारे ४३ अब्ज डॉलर (३.२ लाख कोटी रुपये) मोजण्याची तयारी दर्शवली आहे. याचे वृत्त पसरताच ट्विटरच्या समभागांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्विटरने सांगितले की, इलॉन यांनी बुधवारी कंपनीचे उर्वरित शेअर्स (९.२ टक्के आधीच आहेत) खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. प्रत्येक समभागासाठी ५४.२० डॉलरची ऑफर त्यांनी दिली असून ही अंतिम ऑफर असल्याचे घोषितही केले आहे.
ट्विटर काय म्हणते?
इलॉन मस्क यांनी दिलेली अनपेक्षित, बंधनकारक नसलेली ऑफर मिळाली. ती भागधारकांच्या हिताची आहे की नाही याचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
काय म्हणाले इलाॅन मस्क?
जगभरातील मुक्त अभिव्यक्तीसाठी ट्विटर हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचा माझा विश्वास आहे. यामुळे मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली. माझ्या गुंतवणुकीतून मला आता हे समजले आहे की, कंपनी तिच्या सध्याच्या स्वरूपात या सामाजिक गरजा पूर्ण करणार नाही. ट्विटरला खासगी कंपनी बनवण्याची गरज आहे. ट्विटरमध्ये विलक्षण क्षमता असून मी तिला पूर्णपणे मोकळे करेन.
- इलॉन मस्क, टेस्ला संस्थापक
८.१ कोटी फॉलोअर्स
इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची बातमी येताच ट्विटरच्या समभागांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मस्क हे ३१ जानेवारीपासून प्रत्येक दिवशी ट्विटरचे समभाग खरेदी करत आहेत. ट्विटरवर मस्क यांचे ८.१ कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ते ट्विटरवरील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत.
बाजार मूल्य
३६.७ अब्ज डॉलर
ट्विटरचे प्रमुख भागधारक
इलॉन मस्क- ९.२%
वॅनगार्ड ग्रुप- ८.८%
मॉर्गन स्टॅनली- ८.४%
ब्लॅकरॉक ६.५%
स्टेट स्ट्रीप कॉर्प- ४.५%
जॅक डॉर्सी- २.३%