वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला अवघे ४८ तास उरले आहेत. राजधानी वॉशिंग्टनमध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. आमंत्रितांच्या याद्यांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनही आता आकार घेऊ लागले आहे. त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे ज्यो बायडेन यांनी प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर भारतीयांची निवड केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. बायडेन यांनी आपल्या प्रशासनात भारतीयांना महत्त्वाचे स्थान असेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी तब्बल २० जणांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आहे. या २० जणांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे. अमेरिकी प्रशासनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्राबल्य असणे हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. बायडेन यांनी नियुक्त केलेल्या २० जणांपैकी १७ जण व्हाइट हाउस परिसरातील कार्यालयांत कार्यरत असतील. कोणाला कोणते पद -नीरा टांडेन (व्हाइट हाउस व्यवस्थापन व बजेट या विभागाच्या संचालिका), डॉ. विवेक मूर्ती (यूएस सर्जन जनरल), वनिता गुप्ता (न्यायविभागाच्या असोसिएट ॲटर्नी), उझरा झेया (मानवाधिकार आणि नागरी सुरक्षा विभागाच्या उपमंत्री), माला अडिगा (अध्यक्षांच्या पत्नीच्या धोरण संचालिका), गरिमा वर्मा (डिजिटल संचालिका), सबरिना सिंग (माध्यम उपमंत्री), ऐशा शाह (डिजिटल धोरणाच्या पार्टनरशिप मॅनेजर), समीरा फाझिली (राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या सहसंचालिका), भारत राममूर्ती (उपसंचालक), गौतम राघवन (अध्यक्षीय कर्मचारीवृंदाचे उपसंचालक), विनय रेड्डी (अध्यक्षांच्या भाषणांचे संचालक), वेदांत पटेल (अध्यक्षांचे माध्यम सहायकमंत्री), तरुण छाब्रा (तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वरिष्ठ संचालक), सुमोना गुहा (दक्षिण आशिया विभागाच्या वरिष्ठ संचालिका), शांती कलाथिल (लोकशाही व मानवाधिकारांच्या समन्वयक), सोनिया अगरवाल (हवामान बदलविषयक धोरणाच्या वरिष्ठ संचालिका), विदुर शर्मा (कोविड रिस्पॉन्स टीमचे धोरण सल्लागार), नेहा गुप्ता (सहयोगी वकील), रिमा शहा (उपसहयोगी वकील).
बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 2:26 AM