गेल्या काही वर्षांपासून जगाला अस्थिर करू पाहणारा चीन स्वत: अस्थिरतेकडे वाटचाल करू लागला आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ गायब होत आहेत. चिनी अर्थव्यवस्था डगमगू लागली असतानाचा चीनचे मंत्री, अधिकारी देखील बेपत्ता होत आहेत. अशातच एकाचवेळी चीनने आपल्या ९ जनरलना संसदेतून हटविले आहे.
चीनच्या अधिकृत मीडिया संस्थेने ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे सर्व हैराण झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नऊ वरिष्ठ जनरला संसदेतून बरखास्त करत असल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. यामध्ये रॉकेट फोर्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
जिनपिंग यांनी संरक्षण मंत्री पदी नवी नियुक्ती केल्यानंतरची २४ तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे. बरखास्त करण्यात आलेल्या लोकांमध्ये पाच जण रॉकेट फोर्सचे कमांडर आहेत. झांग झेंझोंग, झांग युलिन, राव वेनमिन, झू शिनचुन, डिंग लायहांग, लू हाँग, ली युचाओ, ली चुआंगगुआंग आणि झोउ यानिंग अशी या सर्व अधिकाऱ्यांची नावे आहेत. याशिवाय हवाई दलाच्या माजी कमांडरलाही बडतर्फ करण्यात आले आहे.
एनपीसीची स्थायी समिती जाहीर करण्यात आली आहे, परंतु, या अधिकाऱ्यांच्या बरखास्तीचे कारण सांगण्यात आलेले नाही. चीनमधील एका नवीन भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे अनेक माजी आणि सध्याच्या रॉकेट फोर्स कमांडरना काढून टाकण्यात आले आहे, असे साऊथ चायनाने म्हटले आहे. कमांडर ली युचाओ, डेप्युटी झांग झेंझोंग आणि लियू गुआंगबिन यांच्या वर्तमान आणि भूतकाळाची चौकशी केली जात आहे. ली हे २०१५ पासून कमांडर होते.