भविष्यात कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:43 PM2022-01-22T12:43:52+5:302022-01-22T12:45:11+5:30
उद्योगपती गेट्स यांनी सांगितला भविष्यातला धोका; सरकारांना एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन
वॉशिंग्टन: संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोना संकटाचा समूळ नायनाट होत नसल्यानं जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोकेदुखी वाढवत आहेत. आतापर्यंत ३५ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढतच आहे. त्यात आता उद्योगपती बिल गेट्स यांनी जगाला पुढील धोका सांगितला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.
भविष्यात कोरोनापेक्षा भीषण महामारी येऊ शकते, असा धोक्याचा इशारा गेट्स यांनी दिला. बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशननं कोएलिशन फॉर एपेडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशनला (सीईपीआय) १५० मिलियन डॉलरची रक्कम दान केली. यावेळी त्यांनी भविष्यातील रोगांबद्दल चिंता व्यक्त केली. जग वेगानं विकसित होत असलेल्या विषाणूंशी मुकाबला करत असल्याचं गेट्स म्हणाले.
संशोधन आणि विकास यांच्यावर केली जाणारी गुंतवणूक आपलं आयुष्य वाचवू शकते हे आपण गेल्या २० वर्षांत पाहिलं आहे. यामुळे आपण सर्वात कठीण काळ टाळू शकतो. भविष्यात येणारी रोगराई, महामारी पाहता सरकारांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं. काही संभाव्य महामारीत मृत्यूचं प्रमाण कोरोनापेक्षा अधिक असू शकतं, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.