मनिला, दि. 18 - फिलीपाईन्समध्ये ड्रग्ज माफियांविरोधात सुरु असलेला लढा दिवसेंदिवस कठोर केला जात असून सलग सुरु असलेल्या कारवाईच्या तिस-या दिवशी 13 जणांची हत्या करण्यात आली आहे. फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्जविरोधात पुकारलेल्या लढाईचा हा भाग असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेशच पोलिसांना देण्यात आला आहे. तीन दिवसांत एकूण 80 जणांची हत्या करण्यात आली आहे.
आणखी वाचाफिलीपाईन्समध्ये 24 तासांत 32 ड्रग्ज माफियांची हत्या आईवरुन शिवी घालणा-या फिलिपिन्सच्या अध्यक्षांची ओबामांनी घेतली भेटराष्ट्राध्यक्षांचे बेताल वक्तव्य, सैनिकाने बलात्कार केल्यास जबाबदारी घेईन
ड्रग्ज आणि रस्त्यांवरील गुन्हेगारीविरोधात पुकारण्यात आलेल्या या मोहिमेला 'वन टाईम, बिग टाईम' असं नाव देण्यात आलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच 67 जणांची हत्या करण्यात आली होती. तर 200 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
उपराष्ट्राध्य लेनी रोब्रेदो यांनी मात्र या कारवाईचा पुर्णपणे निषेध केला आहे. रोड्रिगो दुर्तेते यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून सुरु असलेल्या या रक्तरंजित लढ्याला लेनी रोब्रेदो यांनी नेहमीच विरोध केला आहे. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवत आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे.
मंगळवारी फक्त 24 तासात 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं होतं. पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी अंडरकव्हर ऑपरेशन आखलं होतं. एकूण 66 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ग्राहक बनून ड्रग्ज खरेदी करण्याची 'बाय बर्स्ट' योजना आखली होती अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली होती. काहीठिकाणी हे ऑपरेशन सुरु असताना ड्रग्ज माफिया आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. 20 ठिकाणी 'बाय बर्स्ट' ऑपरेशनदरम्यान तर 14 ठिकाणी शोधमोहिमेदरम्यान चकमक उडाली असल्याची माहिती अधिका-याने दिली होती. या चकमकीत एकूण 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं होतं.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्ज व ड्रग्ज माफियाच्या विरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. जून 2016 मध्ये रॉड्रिगो यांनी फिलीपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत 9000 हून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकण्यात आलं आहे.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना दिसता क्षणीच गोळ्या मारण्याचे आदेश देण्यात आला आहे. रॉड्रिगो यांनी 30 जून, 2016 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतली आहेत. वर्षाच्या आत देशातून ड्रग्जचे नामोनिशान मिटवून टाकेन अशी शपथच त्यांनी घेतली होती. धक्कादायक म्हणजे सामान्य नागरिकांनाही ड्रग्ज माफियांना मारण्याचे आदेश दिले आहेत.