जपानमध्ये लिलावात मासा विकला गेला 4 कोटींना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 12:48 PM2018-01-09T12:48:41+5:302018-01-09T17:07:21+5:30
जपानमध्ये एका लिलावात चक्क ४ कोटींना विकला गेलाय, इतकंच नव्हे तर याआधी त्याहून मोठी किंमत मिळाली होती.
जपान : एखादा दुर्मिळ मासा सापडल्यावर त्या माशाचा लिलाव केला जातो. हा लिलाव फार फार तर हजार किंवा लाखोंच्या घरात असतो. मात्र जपानमध्ये एका माशाला तब्बल 2 कोटींची किंमत मिळाली आहे. ट्युना असं या माशाचं नाव असून या माशाचा दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला लिलाव केला जातो. प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक हा मासा विकत घेतात.
दि हिंदुने दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील त्सुकिजी या मासेबाजारात हा लिलाव केला जातो. हा मासळी बाजार जगातील सगळ्यात मोठा मासळी बाजार आहे असं म्हटलं जातं. 1935 साली सुरू झालेल्या मार्केटमध्ये जगातील प्रत्येक मासा आढळतो. नववर्षाच्या सुरुवातील या मासळी बाजारात ट्युनो या माशाचा लिलाव केला जातो. हा मासा अत्यंत दुर्मिळ असल्याने हा मासा लिलाव करूनच विकला जातो. यंदाच्या लिलावात हा मासा तब्बल 2 कोटींना विकला गेल्याने या माशाची जगभर चर्चा सुरू झाली. अनेक कंपन्यांमध्ये येथे लिलावात बोली लावण्यासाठी प्रसिद्ध कंपन्यांची चुरस पाहायला मिळते. यंदा किओमुरा कंपनीने हा मासा विकत घेतला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सापडलेला ट्युना हा वजनाने आणि आकाराने लहान असल्याचं बोललं जात आहे. कारण गेल्यावर्षी ट्युनो चक्क 4 कोटी 33 हजारांना विकला गेला होता. एवढंच नव्हे तर 2013 साली झालेल्या लिलावात ट्युनो मासा जवळपास 12 कोटींना विकला गेला होता. बोली लावण्याआधी प्रत्येक कंपनी आधी माशाची पारख करते. आपण लावत असलेल्या किंमतीच्या पात्रतेच्या हा मासा आहे की नाही याचीही तपासणी केली जाते, मगच अनेक कंपन्या या लिलावात उतरतात.
आणखी वाचा - ब्लू व्हेल मासे बहुतेक आहेत उजवा हात प्रवृत्तीचे
हा मासळी बाजार फार जुना आहे. 480 प्रकारचे मासे या मासळी बाजारात आढळतात. दरदिवशी जवळपास कोटींच्या घरात या मासळीबाजारात उलाढाल होत असते. तसंच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय वृद्धिंगत करत असल्याने ग्राहकांचा ओघ वाढत जात आहे. परंतु, जवळपास 80 वर्षांचा इतिहास असलेला हा मासळी बाजार आता दुसऱ्या जागी स्थलांतरित होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतीत अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.