वॉशिंग्टन- अमेरिकेत वास्तव्याला असलेले गिलगिटचे माहिती अधिकार कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर खळबळजनक खुलासा केला आहे. सेरिंग यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी पाकिस्तानातील स्थानिक ऊर्दू वर्तमानपत्राचा हवाला देत भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानच्या 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी सैनिकांनी बालाकोटहून खैबर पख्तूनख्वाला हलवल्याची माहिती सेरिंग यांनी दिली आहे.सेरिंग यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी 200हून अधिक दहशतवाद्यांना दफन केल्याचं कबूल केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी त्या दहशतवाद्यांना शहीद संबोधलं आहे. तसेच पाकिस्तान सरकारच्या शत्रूंविरोधात हे लोक काम करत असल्याचंही काही सैनिक म्हणाले आहेत. व्हिडीओमध्ये काही पाक अधिकारी रडणाऱ्या मुलांना शांत करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 1:56 PM