जकार्ता : इंडोनेशियाच्या बँटन प्रांतातील एका तुरुंगात भीषण आग लागली. या आगीत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. कायदे आणि मानवाधिकार खात्याचे प्रवक्ते रिका अप्रिअंटी यांनी याची माहिती दिली आहे. (Fire at overcrowded Indonesian prison kills at least 40 -official)
आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ही आग भडकली. तुरुंग प्रशासन कैद्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम करत आहे, असे त्या म्हणाल्या. Tangerang Prison Block C मध्ये ही आग लागली. या आगीत 8 कैदी गंभीर जखमी झाले असून 73 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबले गेले होते, असे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या तुरुंगातील ब्लॉकमध्ये अमली पदार्थ तस्कर, सेवन करणारे यांना ठेवण्यात येते. ब्लॉकची क्षमता 122 आहे. रिका अप्रिअंटी यांनी आग लागली तेव्हा किती लोक होते हे सांगितले नसले तरी ते क्षमतेपेक्षा जास्त होते, असे म्हणाल्या आहेत. या तुरुंगाची एकूण क्षमता ही 600 कैद्यांची आहे, परंतू सध्या या तुरुंगात 2000 हून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत.