काही वर्षांपूर्वी ISIS दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या एका २५ वर्षीय तरूणीला आता ब्रिटनला घरी परत जायचं आहे. तूबा गोंडल असं या तरूणीचं नाव असून तूबा घरून पळून सीरियाला गेली होती. तूबाला ISIS चा गढ मानल्या जाणाऱ्या रक्कामध्ये 'मॅचमेकर' म्हणून ओळखलं जातं होतं. तूबा साध्या-भोळ्या मुलींचं ब्रेनवॉश करत होती आणि त्यांना दहशतवाद्यांसोबत लग्न करण्यास तयार करत होती. पण आता तिला पुन्हा ब्रिटनला घरी परतायचं आहे. तूबा सध्या तिच्या दोन मुलांसह उत्तर सीरियातील रिफ्यूजी कॅम्पमध्ये आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, तूबाचे वडील लंडनमध्ये बिझनेसमन आहेत. साधारण दोन महिन्यांपूर्वी तूबाने तुर्की सीमेवर ISIS च्या Baghuz कॅम्पमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. रिफ्यूजी कॅम्पमध्ये रोजावा इन्फॉर्मेशन सेंटरसोबत बोलताना तूबा म्हणाली की, 'मला घरी परतायचं आहे. ब्रिटनची जनता घाबरलेली आहे. त्यांना माझ्यासारख्यांना सोबत ठेवायचं नाहीये. पण हे योग्य नाही. आम्ही या कॅम्पमध्ये आमचं जीवन नाही घालवू शकत. मी किंवा माझ्यासारखे लोक समाजासाठी धोका नाहीत. आम्हाला पुन्हा एक सामान्य जीवन जगायचं आहे'.
(Image Credit : Daily Mail)
तूबाने सांगितले की, 'महिला आणि मुला-मुलींची ISIS मध्ये वाईट अवस्था आहे. मी सीरियामध्ये गेल्या ४ वर्षात कुणालाच काही नुकसान पोहोचवलं नाही. अशात मी ब्रिटनसाठी धोका कशी ठरू शकते'. मात्र सारियामध्ये राहत असताना तूबाने सोशल मीडियावर ब्रिटनला एक 'वाईट देश' असं म्हटलं होतं. सोबत २०१५ मध्ये तिने पॅरिसवर झालेल्या हल्ल्याची प्रशंसा देखील केली होती.
तूबा गोंडल २०१६ दरम्यान एकाएकी गायब झाली होती. तेव्हा ती यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या गोल्डस्मिथ कॉलेजमध्ये शिकत होती. रोजावा इन्फॉर्मेशन सेंटरनुसार, पतीच्या निधनानंतर तूबाने दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. ही व्यक्ती पाकिस्तानची होती आणि दहशतवादी होती. आता त्याचाही मृत्यू झालाय.
दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर तूबाने इकडेतिकडे भटकत दिवस काढले. ती सांगते की, 'आम्हाला नाही माहीत की, आमच्यावर कोण हल्ले करत आहेत. आम्ही कुणासोबत आहोत...हा सगळा गोंधळ आहे'. तूबाला काही दिवसांपूर्वी तुर्की सीमेवर चेकपॉइंटवर थांबवलं गेलं आणि पुन्हा रिफ्यूजी कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं.