आपल्या मुलासाठी तस्करी करुन गांजा आणणार- ब्रिटिश मातेचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 12:43 PM2018-06-11T12:43:47+5:302018-06-11T12:43:47+5:30
इंग्लंडमध्ये वैद्यकीय उपयोगासाठीही गांजा वापरण्यास बंदी आहे.
लंडन- एपिलेप्सीशी (अपस्मार-फिट्स येणे) झगडणाऱ्या आपल्या मुलासाठी गांजायुक्त औषध आणण्याचा निर्णय एका ब्रिटिश महिलेने घेतला आहे. इंग्लंडमध्ये वैद्यकीय कारणासाठी गांजा वापरण्यास बंदी आहे. आपल्या मुलाला विशिष्ट गांजायुक्त औषध मिळावे यासाठी शार्लोट काल्डवेल गेले अनेक महिने इंग्लंडमध्ये प्रयत्न करत आहेत.
शार्लोट यांच्या मुलाचे नाव बिली असून त्याला अपस्माराचा त्रास आहे. त्याच्या आजारावर नियंत्रण यावे यासाठी शार्लोट यांनी अमेरिकेतील डॉक्टरांशी चर्चा केली होती आणि गांजायुक्त औषधाचे प्रिस्क्रिप्शन मिळवले बोते. इंग्लंडमध्ये अथक प्रयत्नांनंतर बिलीच्या उपचारांसाठी ते औषध पुरवण्यास एक डॉक्टर तयारही झाले मात्र इंग्लंडच्या गृहविभागाने नुकतेच हे औषध वापरु नये असे आदेश दिले आहेत. जर हे औषध डॉक्टर पुरवत राहिले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद गृहविभागाने दिली आहे.
त्यामुळे शार्लोट यांनी आता आपल्याकडे केवळ स्मगलिंगचा पर्याय शिल्लक राहिला असल्याचे सांगत आपल्या मुलासाठी कॅनडातून इंग्लंडमध्ये परत येताना गांजायुक्त औषध आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. औषधी उपयोगासाठी गांजाचा वापर करण्यास कॅनडामध्ये परवानगी आहे. आता तर इतर उपयोगांसाठी गांजा खुला करण्याच्या हालचाली कॅनडामध्ये सुरु असून लवकरच तेथे गांजाचा वापर कायदेशीर होणार आहे. आपल्या मुलाच्या आयुष्यासमोर आपण घेत असलेला निर्णय अत्यंत लहान असल्याचे मत शार्लोट यांचे आहे.