लंडन : ब्रिटनमध्ये सर्व वयस्कांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांना सर्व निर्बंधांमधून मुक्त करण्यात आले आहे. हा दिवस ‘फ्रिडम डे’ म्हणून मोठ्या जल्लोषात नागरिकांनी साजरा केला. मात्र, लसीचे ८ कोटींहून अधिक डोस दिल्यानंतरही कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन उठविण्याच्या निर्णयामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे स्वत: विलगीकरणात असल्याने या ‘फ्रिडम डे’ला गालबोटही लागले. तब्बल १८ महिन्यांनी ब्रिटनमधील नाइटक्लब सुरू झाले. त्यामुळे देशभरात हजारो लोकांनी मनसोक्त नाचून ‘फ्रिडम डे’ पार्टी साजरी केली.
बोरीस जॉन्सन विलगीकरणात
‘फ्रिडम डे’चा नारा देणारे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना हा दिवस विलगीकरणात साजरा करावा लागला. त्यांचे सहकारीमंत्री साजीद जावेद यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यांच्या संपर्कात आलेले जॉन्सन आणि रिषी सुनक यानाही विलगीकरणात जावे लागले.
नाइट क्लब हॉटस्पॉट?
नाइट क्लबमध्ये जाणारा १८ ते २५ या वयोगटातील वर्ग खूप मोठा आहे. मात्र, या वयोगटातील सर्वांचे पूर्ण लसीकरण झाले नाही. तेथून विषाणूचा झपाट्याने संसर्ग होण्याचा धोका आहे.