ब्रिटनमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक यांची एंट्री! जाणून घ्या कोण आहे टॉपवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 09:00 AM2022-11-25T09:00:00+5:302022-11-25T09:02:40+5:30
british pm rishi sunak : या वर्षीच्या यादीत समाविष्ट आशियाई श्रीमंतांची एकूण संपत्ती 113.2 अब्ज पौंड आहे. ही मालमत्ता मागील वर्षाच्या तुलनेत 13.5 अब्ज पौंड अधिक आहे.
ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांचा 'ब्रिटनमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत' (Asian Rich List 2022 in UK) समावेश आहे. आशियाई श्रीमंतांच्या या यादीत हिंदुजा कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. 790 दशलक्ष पौंडच्या (69,336,397,400 रुपये) अंदाजे संपत्तीसह पंतप्रधानऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना यादीत 17 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
अक्षता मूर्ती यांचे वडील एनआर नारायण मूर्ती हे भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक आहेत. या वर्षीच्या यादीत समाविष्ट आशियाई श्रीमंतांची एकूण संपत्ती 113.2 अब्ज पौंड आहे. ही मालमत्ता मागील वर्षाच्या तुलनेत 13.5 अब्ज पौंड अधिक आहे. हिंदुजा कुटुंबाने 'ब्रिटनमधील आशियाई श्रीमंतांच्या यादीत' सलग आठव्यांदा अव्वल स्थान पटकावले असून त्यांची एकूण संपत्ती 30.5 अब्ज पौंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी हिंदुजा कुटुंबींच्या संपत्तीत 3 अब्ज पौंड वाढ झाली आहे.
लंडनचे महापौर सादिक खान यांनी बुधवारी रात्री वेस्टमिन्स्टर पार्क प्लाझा हॉटेलमध्ये 24 व्या वार्षिक आशियाई व्यवसाय पुरस्कार सोहळ्यात हिंदुजा समूहाचे सह-अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांची कन्या रितू छाब्रिया यांना 'एशियन रिच लिस्ट 2022' ची प्रत दिली. हिंदुजा ग्रुप हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे. हिंदुजा ग्रुप एकूण 11 क्षेत्रात व्यवसाय करत आहे.
ब्रिटनमध्ये आशियाई समुदायाचा दर्जा वाढला
या वर्षीच्या आशियाई श्रीमंतांच्या यादीत ब्रिटनमधील 16 अब्जाधीशांचा समावेश आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत एक अधिक आहे. या सोहळ्यात संबोधित करताना डची ऑफ लँकेस्टरच्या चान्सलर यांनी ऋषी सुनक यांचे कौतुक केले. ते म्हणाले- 'दरवर्षी ब्रिटिश आशियाई समुदायाचा दर्जा वाढत आहे. हे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आश्चर्यकारक नाही. ब्रिटीश आशियाई समुदायाची मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलता मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. अर्थात माझ्या नवीन नोकरीवर माझा एक ब्रिटिश आशियाई बॉस आहे. तो माझा खूप चांगला मित्र आहे.
210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान
गेल्या महिन्यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आणि नवा इतिहास रचला. बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे 42 वर्षीय ऋषी सुनक हे 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत. ऋषी सुनक हे या वर्षातील तिसरे पंतप्रधान आहेत.