वॉशिंग्टन : टिकटॉकच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातील मोठा हिस्सा अमेरिकी सरकारच्या खजिन्यात यायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. टिकटॉकवर भारत सरकारने याआधीच बंदी घातली आहे. टिकटॉकबाबत ट्रम्प प्रशासनाने वेगळी भूमिका घेतली आहे. टिकटॉकची मालकी अमेरिकी कंपनीकडे आली नाही तर अमेरिकेत या अॅपला बंदी घातली जाईल, असे ट्रम्प यांनी घोषित केले आहे. टिकटॉक अमेरिकी कंपनीने खरेदी करावे यासाठी १५ सप्टेंबरची मुदत त्यांनी दिली आहे.
व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही दिल्याशिवाय त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. टिकटॉक ही एक मोठी मालमत्ता आहे हे खरे आहे; पण अमेरिकी सरकारने मान्यता दिली नाही तर ती अमेरिकेत मोठी मालमत्ता होऊ शकत नाही! सरकारने परवानगी दिली तरच ते या देशात येऊ शकतात. त्यामुळे टिकटॉकच्या खरेदी-विक्री व्यवहारातून येणाºया पैशातील मोठा हिस्सा अमेरिकेच्या खजिन्यात जायला हवा.अमेरिकी खजिन्यात पैसा खरेदीदार मायक्रोसॉफ्टकडून यायला हवा की, टिकटॉकची मूळ चिनी कंपनी बाइट डान्सकडून यायला हवा, या प्रश्नावर ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेला लक्षणीय हिस्सा मिळायला हवा, मग तो कोणाकडूनही मिळो.